नाल्यांच्या स्वच्छतेअभावी शेकडो एकर जमिनीत पाणी
शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने सदर नाल्यांच्या परिसरात येणाऱ्या शेकडो एकर शेत जमिनीमध्ये पावसाचे पाणी शिरुन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. जिल्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन सदर नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन बेळगाव शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याची अनेक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नसल्याने शहराच्या बाजूने गेलेल्या या नाल्यांच्या परिसरातील शेतीमध्ये पावसाचे पाणी शिरुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी पावसामध्ये शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदन देवूनही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिएकर लाख रुपयांचा फटका बसत आहे.
नाला स्वच्छता केल्याचे सांगून निधी हडप केला जात आहे. नाल्यांची स्वच्छता केली नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सदर पाणी शेतवडीमध्ये शिरत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी शिरुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेवून गोरगरीब शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी आणि निर्माण झालेले अडथळे दूर करुन पावसाच्या पाण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांकडून संबंधित प्राधिकारकडे निवेदन दिले जात असले तरी कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. सादर केलेल्या निवेदनाची दखल घेण्यात यावी. याबरोबरच मुचंडी गावाजवळही नाल्याच्या परिसरात अडथळे निर्माण झाले असून सदर अडथळे दूर करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.