जिहे-कटापूर योजनेचे पाणी पेटणार
सातारा :
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले आहेत. उन्हाळ्यामध्ये सातारा जिह्यातील दुष्काळी भागासाठी जिहे-कटापूर योजना नवसंजीवनी ठरू पाहात आहे. त्याच योजनेकरता धोम धरणातून पाणी सोडले आहे. त्या पाण्याला विरोध करत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी कृष्णानगर येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे जिहे-कटापूरच्या पाण्यावरून जिह्यात नवा वाद निर्माण होणार आहे. दुष्काळी तालुक्यातील जनता विरुद्ध धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती यांच्यातील हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दगडू माने- पाटील यांच्या नेतृत्वाखाली माणिकराव जगन्नाथ भोसले, मदन जगताप, माणिक आनंदराव भोसले, सुधाकर बर्गे, संतोष भोसले, जगन्नाथ भोसले, सत्यवान भोसले यांनी आंदोलन करत सह्यांचे निवेदन कृष्णा खोरे विकास महामंडळास दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 25 फेब्रुवारी रोजी सातारा सिंचन मंडळास निवेदन दिले होते. त्यामध्ये नियमबाह्य जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले पाणी तातडीने बंद करण्याची विनंती केली होती. परंतु अद्यापही धोम धरणातून सोडलेले पाणी बंद केले नाही. हे पाणी 15 फेब्रुवारी रोजी सोडले आहे. त्याची माहिती त्याच दिवशी मिळाली होती. परंतु 17 फेब्रुवारी रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक कोयनानगर येथे झाली. या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर जिहे- कटापूर उपसा सिंचन योजनेबद्दल चर्चा झाली होती. चर्चेदरम्यान आम्ही विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. आपण मार्चमध्ये मुंबई येथे बैठक लावू. त्यानंतर पाणी वाटपाबद्दल निर्णय घेऊ, असे सांगितले होत. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.
धोम धरणातून जिहे- कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य पाणी सोडले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नदीपात्रात पाणी सोडून धोम लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था बाधित होणार असून उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहे. तसेच धोम प्रकल्प अहवाल, कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजना यांच्या प्रकल्प अहवालानुसार अशाप्रकारे नदीपात्रात धरणातील साठ्यातून पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही. गत पावसाळ्यात धोम धरणातून 4.69 टीएमसी पाणी सोडले आहे.
त्यामुळे आजमितीस धोम धरणातील साठ्यातून पाणी देय नाही. जिहे- कटापूर उपसा योजना ही चारमाही असून पावसाळ्यात वाहून जाणारे 3.17 टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी चारमाही योजनेतून देणे आहे. त्या योजनेला पाणी साठवण टँक कोठे नाही. त्या योजनेला खरीप हंगामात सोडण्यासाठी धोम बलकवडी धरणातून 0.53 टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. 14 ऑक्टोबरनंतर नदी पात्रातून पाणी उपसण्यास पूर्ण बंदी आहे. धोम धरणातील 43 गावांचे पुनर्वसन कोरेगाव तालुक्यात झाले आहे. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांच्या शेतीला बारमाही पाणी देणे अनिवार्य आहे. असे असताना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. तसेच वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव तालुक्यातील कण्हेर धरणातील व कोयना धरणातील गावे पुनर्वसित केलेली आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने अन्याय होत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला धोम धरणातून 0.53 टीएमसी पाणी देण्याच्या ठरावाला विरोध असूनसुद्धा राजकीय हस्तक्षेप करुन माण खटावच्या नेत्यांनी धोमच्या धरणातून नियमबाह्य पाणी सोडले आहे. याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे, असे त्यांनी सांगितले.
- अधिकारी नसल्याने नाराजी
राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढूया, असे आवाहन करत आंदोलनातील प्रमुख नेत्यानी कृष्णानगर येथे अधिकारीच निवेदन स्वीकारायला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.