हेळवाकमध्ये पाणी शिरले, कराड-चिपळूण महामार्ग ठप्प
कोयनानगर / विलास कदम :
कोयना परिसरात पावसाने अक्षरशः धुमशान माजवले असून धोधो पडत असलेल्या पावसाने कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे अकरा फुटांनी उचलून कोयना नदी पात्रात प्रती सेकंद एकूण ८० हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने पुराचे पाणी हेळवाक गावात व कराड चिपळूण महामार्गावर आले आहे. कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, हेळवाक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरात, दुकानात व शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले असून येथील अनेक कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.
कोयना परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून पूर्वेकडील भागात व शहरांमध्ये, गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये व झालीच तर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे नऊ फुटांनी उचलून कोयना नदी पात्रात विसर्ग केला जात होता. दुपारी तीन वाजता धरणाचे सहाही वक्र दरवाजे नऊ फुटावरून ११ फुटापर्यंत वर उचलण्यात आले. कोयना नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद ७८४०० क्युसेक व पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाणी असे एकूण ८० हजार ५०० क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
- कापणा नदीला फुग; गावात पुराचे पाणी
कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने कापणा नदीला फुगी येऊन पुराचे पाणी हेलवाक गावात शिरले असून पुराचे पाणी कराड-चिपळूण महामार्गावर आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. पुराचे पाणी हेळवाक गावातील राजेंद्र वसंत कदम, दगडू लांबोर, गीता शशिकांत देसाई, जनार्दन कोळेकर, लुमाजी कोळेकर, भीमराव शिंदे, काशिनाथ चव्हाण यांच्या घरात शिरले असून कराड-चिपळूण रस्त्यालगत असणाऱ्या बिस्मिल्लाह फिरोज पालवणकर, रोशन हुसेन मीराखान, इर्शाद पालवणकर, दत्तात्रेय चव्हाण, रोहित चव्हाण, उरमानभाई पालवणकर, विनायक आगवणे, अविनाश चव्हाण, सपकाळ बाशिंगवाले, कुमारशेठ नायर, किसन कदम, अविनाश डांगे, योगेश कानडे, धीरज कदम यांच्या पोल्ट्री शेड या करण्यात आल्याचे व प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे मंडलाधिकारी संजय जंगम यांनी सांगितले.
दरम्यान हेळवाक येथील ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांना स्थलांतरित केले असून ज्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे, त्यांचे साहित्यही सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मंडलाधिकारी संजय जंगम, तलाठी जाधव, तलाठी भाग्यवंत, पोलीस पाटील, उदय राऊत, सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत.