चिंताजनक | जत शहराचा गळा सुकला! पन्नास हजार लोकसंख्येला केवळ २० दिवसांचं पाणी
जत शहरावर पाणीसंकटाचे सावट; बिरनाळ तलावात फक्त 20 दिवसांचा साठा
जत -पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जत शहरासमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात अवघा वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून तलावाची पातळी झपाट्याने मृत संचयाच्या दिशेने घसरत आहे. दरम्यान, शहरासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झालेला असतानाही अद्याप पाणी सोडण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून बिरनाळ तलावातील पाणीपातळी सातत्याने घटत आहे. दररोज सुमारे एक ते दीड फूट पाणी कमी होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. यंदाच्यासेल्सिअसचा टप्पा गाठल्याने भूजल पातळी आणि उपलब्ध जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात बिरनाळ तलाव शंभर टक्के क्षमतेने भरला होता. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सहज पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीव्र उष्णता, बाढते बाष्पीभवन आणि मान्सूनपूर्व पावसाने दिलेली ओढ यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपत आले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
दररोज ३२ लाख लीटर पाण्याची आवश्यकता
जत शहराला दररोज किमान ३२ लाख लीटर पाण्याची आवश्यकताअसते. हा पुरवठा करण्यासाठी १०० एचपी क्षमतेचे पंप जवळपास चोवीस तास कार्यरत ठेवावे लागतात. तरीही सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे कठीण बनले असून अनेक भागांत आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे.तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे गाळमिश्रित पाणी पुरवठ्यात येण्याची शक्यता वाढली असून त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नव्या पाणी योजनेच्या कामामुळेही अडचणी
शहरात सध्या सुमारे ७९ कोटींच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. ही योजना पूर्णत्वाकडेजात असल्याने भविष्यातील पाणीप्रश्र सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, विविध भागांत सुरू असलेल्या पाईपलाईन खोदकामामुळे उपनगरांतील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या शहरात १५ हजारांहून अधिक अधिकृत नळजोडण्या असून नव्या योजनेनंतर आणखी वाढ होणार आहे.
म्हेसाळमधून एक टीएमसी पाणी आरक्षित
जत शहराच्या दीर्घकालीन पाण्याची गरज लक्षात घेऊन तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बिरनाळ तलाबासाठी म्हैसाळ योजनेतून दरवर्षी एक टीएमसी पाणी आरक्षित करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडे आवश्यक रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यावर्षी संबंधित रक्कम भरण्यास विलंब झाल्यामुळे आवर्तनाचे पाणी सोडण्यात उशीर झाल्याची माहिती समोर येत आहे.