Ratanagiri News: शस्त्रास्त्र प्रकल्पात शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी : उदय सामंत
वाटदमधील जनप्रबोधन सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विरोधकांवर टीकास्त्र
रत्नागिरी: वाटद एमआयडीसीमध्ये देशातील पहिला प्रदूषणविरहित सेमीकंडक्टर कारखाना उभारण्यात येणार असून हा प्रकल्प भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारी शस्त्र आणि उपकरणे तयार करेल. हा प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी आहे.
येथील कोणतेही मंदिर किंवा घराला हात लावणार नाही. सर्वात जास्त जमिनीला भाव, रोजगार आणि कराराच्या पलिकडे जाऊन काम देऊ. शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. माझ्या घरच्या माणसांचे नुकसान होणार नाही हे बाहेरच्यांपेक्षा मला चांगले माहिती आहे, असे प्रतिपादन वाटद-खंडाळा येथे झालेल्या जनप्रबोधन सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
आठ दिवसापूर्वी वाटद-खंडाळा येथे नियोजित शस्त्रास्त्र उत्पादन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांची सभा पार पडली होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाने प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करण्याची जोरदार मागणी होती.
या पार्श्वभूमीवर प्रकल्प समर्थकांनी शनिवारी वाटद-खंडाळा येथेच बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला 21 जुलै रोजी जाहीर केल्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
बैठकीला प्रकल्प समर्थक स्थानिक व्यापारी संघटना आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. बैठकीत सामंत यांनी प्रकल्प समर्थकांना प्रकल्प येथेच होणार असल्याबाबत आश्वस्त केले. तसेच प्रकल्प विरोधकांवरही जोरदार टीका केली.
या प्रकल्पांमुळे स्थानिक तऊणांना आपल्या आई-वडिलांसमोरच नोकरी करण्याची संधी मिळेल. आपल्या आई-वडिलांच्या समोर नोकरी करावी म्हणून प्रदूषणविरहित कारखाना जर मी आणत असेल तर मी काय चूक करतोय, असा सवाल सामंत यांनी केला. कौशल्य विकास संस्था उभारून अकुशल कामगारांना प्रशिक्षण देण्याची आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली, ज्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.