For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लवकरच कचर्‍याचे चार प्रकारांत वर्गीकरण

12:38 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
लवकरच कचर्‍याचे चार प्रकारांत वर्गीकरण
Advertisement

महापालिकेकडून तयारी पूर्ण : बल्क वेस्ट जनरेटर्सची यादी तयार

Advertisement

बेळगाव : राज्यातील सर्व महानगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यास बेळगाव महापालिका सज्ज झाली असून कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाणार आहे. लवकरच ओला, सुका, सॅनिटरी, स्पेशल केअर वेस्ट अशा प्रकारे कचऱ्याची उचल केली जाणार आहे. नव्या नियमानुसार प्रत्येक घर, व्यावसायिक संस्था व इतर कचरा उत्पादकांकडून मूळ ठिकाणीच कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात ओला, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि स्पेशल केअर वेस्टचा समावेश आहे. बॅटऱ्या, बल्ब, कालबाह्या औषधे, रंगाचे डबे यासारख्या धोकादायक स्वरूपाच्या वस्तूंची उचल केली जाणार आहे.

यासाठी महापालिकेला कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यंत्रणा अधिक सक्षम करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या शहरातील हॉटेलांची यादी महानगरपालिकेकडून तयार करण्यात आली आहे. बल्क वेस्ट जनरेटर म्हणून त्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यामध्ये हॉटेल पै, हॉटेल रामदेव, हॉटेल मेरियॉट, हॉटेल वेलकम, हॉटेल युके 27 आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजचा समावेश आहे. या ठिकाणी दररोज जवळपास अडीचशे किलो कचरा निर्माण होतो. या संस्थांनी आपल्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. जर अशी सुविधा उपलब्ध नसेल तर महानगरपालिका त्यांच्याकडून वर्गीकृत कचरा स्वीकारून शुल्क आकारणार आहे. त्यासाठी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

Advertisement

ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन, मायक्रोबियल, कंपोस्टिंग, व्हर्मी कंपोस्टिंग आणि अॅन अॅरोबिक डायजेशन या पद्धतीने प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे. तर स्पेशल केअर वेस्ट संकलनासाठी प्रत्येक पाच चौरस कि. मी. परिसरात किमान 1 डिपॉझिशन सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकंदरीत कचरा वर्गीकरणापासून ते झिरो वेस्ट उद्दिष्टापर्यंत व्यापक कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. सध्या शहरातून ओला आणि सुखा अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची उचल केली जाते. मात्र यापुढे बेळगावकरांना चार प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करून सदर कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीकडे द्यावा लागणार आहे.

Advertisement
Tags :

.