For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महालक्ष्मी यात्रेतील कचरा स्मशानभूमीत

12:24 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
महालक्ष्मी यात्रेतील कचरा स्मशानभूमीत
Advertisement

कंग्राळी बुद्रुक येथील प्रकार : गावामध्ये दुर्गंधीच्या वातावरणासह माशांचा उपद्रव

Advertisement

बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावच्या महालक्ष्मी यात्रेत निर्माण झालेल्या कचऱ्याची उचल करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्यात आला. त्यामध्ये प्लास्टिक, मांसाहारी जेवणाचे खरकटे व इतर साहित्य असल्याने गावात दुर्गंधीसह माशांचा उपद्रव वाढला आहे. दुर्गंधीला कंटाळलेल्या नागरिकांनी कचऱ्याला आग लावल्याने अर्धाअधिक कचरा जळाला आहे. तर काही कचरा तसाच आहे. त्यामुळे त्याची कधी विल्हेवाट लावणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंग्राळी बुद्रुक गावची महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रा काळात मांसाहारी जेवणाचे आयोजन करण्यात आल्याने जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग पडले होते. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची उचल करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या पीडीओंनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन केले नाही.

स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वाहनात बसून वाहन चालवत असल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला. उचल केलेला कचरा खरे तर तुरमुरी कचरा डेपोकडे नेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता गोळा झालेला कचरा गावातील स्मशानभूमीच्या आवारात नेऊन डंप केला. कचरा कुजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने प्रचंड दुर्गंधी पसरण्यासह माशांचा उपद्रव वाढला आहे. तरीदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वैतागलेल्या नागरिकांनी रविवारी कचऱ्याला आग लावली. कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेची चार वाहने आली होती. मात्र कचरा पेटवून देण्यात आल्याने दोन वाहनांतून कचरा नेण्यात आला. तर उर्वरित दोन वाहने परत फिरली. उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खोदण्यात आला असून त्यामध्ये कचरा टाकून त्यावर माती ओढली जाणार आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या गलथान कारभाराचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.