दोडामार्गात वनकर्मचाऱ्यांवर गांधील माशांचा हल्ला
दोडामार्ग - वार्ताहर
तिलारी धरणक्षेत्रा पलीकडील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात पाहाणीसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर गांधील माशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. यात तिघेजण जखमी असून त्यातील एका कर्मचाऱ्यावर गोवा आझीलो येथे उपचार सुरू आहेत. तर, अन्य दोघांवर दोडामार्ग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाने सांगितले. याबाबत मिळालेली अन्य माहिती अशी की, तिलारी धरण क्षेत्रापलीकडे वनविभागाच्या अखत्यारीतील नैसर्गिक राखीव साधनसंपत्ती आहे. त्याच्या देखभालीसाठी वन विभागाचे कर्मचारी जात असतात. त्याच प्रमाणे शुक्रवारी देखील वनविभागाच्या १२ कर्मचाऱ्यांचे पथक तिलारी बुडीत क्षेत्राताच्या पलीकडे पाटये येथे पाहणी साठी गेले होते . तिलारी धरणाच्या जलाशयातून बोटीच्या सहाय्याने ते पलीकडे गेले. त्यानंतर त्यांनी जंगलात प्रवेश केला. जंगलात भ्रमण करीत असताना अचानकगांधील माशांनी वनविभाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. गांधील माशांनी हल्ला करताच सर्वजण सैरभैर होऊन वाट मिळेल त्या दिशेने पळ काढला. मात्र, त्यातील तिघांवरगांधील माशांनी हल्ला चढविला. गांधील माशांच्या हल्यात घायाळ झालेल्या त्या तिघाही कर्मचाऱ्यांना पुनच्छ बोटीने धरणावर आणण्यात आले. त्यांना लागलीच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तिघांवर उपचार करण्यात आले. मात्र, एक कर्मचारी जास्तच अस्वस्थ असल्याने त्याला गावा आझिलो येथे पाठविण्यात आले. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघांचीही तब्बेत ठीक असल्याचे सांगण्यात आले.