For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहून गेलेल्या दर्शनचा मृतदेह आढळला

12:48 PM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहून गेलेल्या दर्शनचा मृतदेह आढळला
Advertisement

साईनगर तिस्क उसगाव येथील घटना : रामनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार

Advertisement

वार्ताहर/उसगाव

साईनगर, तिस्क उसगाव येथे ओहोळात वाहून गेलेल्या दर्शन संतोष नार्वेकर या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह काल गुऊवारी दुपारी 12.45 वा. सुमारास खांडेपार नदीजवळ ओहोळ्याच्या शेवटच्या टप्प्यावर आढळून आला. बुधवारी सायंकाळी 7 वा. सुमारास ट्यूशन क्लास संपल्यानंतर पायी चालत घरी येत असताना वाटेत लागणाऱ्या ओहोळात हा मुलगा वाहून गेला होता. घटनेनंतर तब्बल सतरा तासांनी त्याचा मृतदेह आढळून आला.

Advertisement

इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या दर्शन याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह पाटये-रामनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दर्शन हा ट्युशन क्लास सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे पायी चालत साईनगर येथील आपल्या घरी परतत होता. मुख्य रस्ता सोडून त्याच्या घराकडे जाणारी ही पायवाट जवळची असल्याने ट्युशनला जाणाऱ्या वाड्यावरील मुलांना ही वाट सोयीस्कर आहे.

ज्या ओहोळाच्या प्रवाहात दर्शन वाहून गेला, त्यात पायाची पावले बुडतील एवढेच जेमतेम पाणी असते. मात्र बुधवारी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे ओहोळातील पाण्याची पातळी वाढली होती. अन्य मुलांसोबत ओहोळ पार करताना सर्वांत पुढे असलेला दर्शन जोरदार प्रवाहासोबत वाहून गेला. यावेळी एका मुलाने त्याला वाचविण्यासाठी त्याच्या खांद्यावरील बॅग पकडली होती. पण बॅग सुटून त्याच्या हातात राहिली व दर्शन वाहून जात नजरेआड झाला होता.

रात्री अडीज वाजेपर्यंत शोधकार्य

घटनेनंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत फोंडा अग्निशामक दलाचे पथक व फोंडा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ओहोळात बऱ्याच अंतरावर त्याचा शोध घेतला. पहाटे 2.30 वा. पर्यंत हे शोधकार्य चालले होते. गुऊवारी सकाळी 6 वा. पासून पुन्हा शोधकार्याला सुऊवात करण्यात आली. घटनास्थळापासून ज्या ठिकाणी खांडेपार नदीला हा ओहोळ जाऊन मिळतो तिथपर्यंत शोध घेण्यात आला.

पाच किलोमीटरवर सापडला मृतदेह 

फोंडा अग्निशामक दलाच्या पथकाने खांडेपार नदीतून फायबर बोटच्या साहाय्याने ओहोळाच्या दिशेने शोध घेण्यास सुऊवात केल्यानंतर दुपारी 12.45 वा. सुमारास एमआरएफ व फिनोलेक्स कंपनीच्या पाठिमागे असलेल्या नदी व नाल्याच्या संगमाजवळ झाडीत अडकलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळावऊन साधारण चार ते पाच किलोमीटरपर्यंत तो वाहून आला होता. शोधकार्यात स्थानिकांबरोबरच फोंडा अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी सुशिल मोरजकर, राम परब, मनमेश नाईक, अमृत नाईक, सुशांत परब, जितेंद्र भंडारी, गुऊप्रसाद साळगांवकर व मनोज नाईक यांचा सहभाग होता.

आरोग्यमंत्री, पंचसदस्याकडून साहाय्य

स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शोध मोहिमेसाठी नौदल पोलिसांचीही मदत मागितली होती. तसेच दर्शन याच्या कुटुंबाला सहानुभूतीपोटी आवश्यक मदत पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. कामानिमित्त मुंबईत गेलेले स्थानिक पंचसदस्य गोविंद परब फात्रेकर हे घटनेची माहिती मिळताच गुऊवारी सकाळी तातडीने उसगावात दाखल झाले आणि दर्शन याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रामनगर येथील मूळ गावी नेण्याची व्यवस्था केली. मयत दर्शन हा भामई पाळी येथील ताराबाई दळवी हायस्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले असून त्याला आई व दोन मोठ्या बहिणी आहेत. दर्शनच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या कुटुंबावर अवघ्या दोन वर्षांतच आणखी एक आघात झाला आहे.

Advertisement
Tags :

.