पुतीन यांच्या घरावर युक्रेनचा हल्ला ?
रशियाचा आरोप, शांतीप्रक्रियेला पोहचणार धोका
वृत्तसंस्था / मॉस्को (रशिया)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर युव्रेनच्या सेनेने ड्रोन हल्ला केला आहे, असा आरोप रशियाने केला आहे. पुतीन यांच्या निवासस्थानावर मंगळवारी युक्रेनने 91 दीर्घ पल्ल्याची ड्रोन्स सोडून निवासस्थान उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो विफल ठरला असून पुतीन सुखरुप आहेत, असेही रशियाने स्पष्ट केले आहे. तथापि, युक्रेनने हा आरोप नाकारला आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने या ड्रोन हल्ल्याचा निषेध केला आहे.
रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या या हल्ल्याच्या प्रयत्नासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी युव्रेनच्या सेनेने पुतीन यांच्या व्रेमलिन येथील निवासस्थानावर दीर्घ पल्ल्याचे ड्रोन्स सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन्सची संख्या 91 ते 100 इतकी होती. तथापि, हे सर्व ड्रोन्स हवेतच निकामी करण्यात रशियाच्या वायुसुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे निवासस्थानाची कोणतीही हानी झाली नाही. पुतीन यांनाही कोणताही धोका पोहचला नाही, असे लाव्हरोव्ह यांनी प्रसारित केलेल्या संदेशात स्पष्ट केले गेले.
शांतता प्रक्रियेवर परिणाम...
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात होत असलेले युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन शांती स्थापन करण्याविषयी चर्चा केली. अमेरिकेने हे युद्ध थांबविण्यासाठी एक योजना सादर केली असून तिच्यावर बव्हंशी एकमत झाले आहे, असे अमेरिका, रशिया आणि युक्रेन या तिन्ही देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे युद्ध त्वरित थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यावरही या तीन देशांचे एकमत आहे. तथापि, पुतीन यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कथित हल्ल्यामुळे शांती प्रक्रिया रुळावरुन घसरण्याची शक्यता आहे, अशी चिंता अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केली.
झेलेन्स्की यांचा इन्कार
युव्रेनने पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे नाकारला आहे. हल्ल्याचे हे वृत्त धादांत खोटे आहे. आम्ही सध्या युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आमच्याकडून अशी कृती केली जाणे शक्य नाही. कोणीही अशा प्रकारची धोकादायक वक्तव्ये करू नयेत. तशी वक्तव्ये केल्यास शांती प्रक्रिया घसरु शकते. तसेच भविष्यातील शांती चर्चेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रशियावर आरोप
रशियाकडून जाणूनबुजून अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा वक्तव्यांपासून सावध रहावे आणि त्यांचा निषेध करावा. युद्ध थांबविण्याच्या दिशेने आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून बरेच प्रयत्न केले आहेत. तसेच या दिशेने मोठी प्रगतीही केली आहे. युद्ध थांबू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली असताना हेतुपुरस्सर अशी वक्तव्ये करुन शांती प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे. ही बाब अत्यंत धोकादायक आहे, असा प्रत्यारोप युक्रेनकडून मंगळवारी करण्यात आला आहे.
भारताचे शांतीसाठी प्रयत्न
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, दोन्ही देशांना आता त्वरित युद्ध थांबवावे, अशी मागणी केली आहे. या युद्धात प्रारंभापासूनच भारताने शांततेचा पक्ष स्वीकारला आहे. आम्ही या युद्धासंबंधात त्रयस्थ भूमिका घेत नसून शांतीच्या बाजूने उभे आहोत. हे युद्ध कोणासाठीही लाभदायक नाही, अशी आमची आधीपासूनची भूमिका आहे. आता तरी युद्ध थांबविले जाईल, अशी आशावादी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.