अमेरिकन फेडरल बँक अध्यक्षपदी वॉर्श
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या अध्यक्षपदी केव्हीन वॉर्श यांची नियुक्ती केली आहे. ते जेरॉम पॉवेल यांचे स्थान घेत आहेत. केव्हीन वॉर्श हे फेडरल बँकेचे माजी अधिकारी आहेत. ट्रंप यांच्याशी मतभेद झाल्याने पॉवेल यांनी त्यागपत्र द्यावे अशी सूचना ट्रंप यांनी केली होती. ट्रंप हे गेल्या जानेवारीत अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. तेव्हापासूनच त्यांचे पॉवेल यांच्याशी मतभेद होते. त्यांनी अनेकदा पॉवेल यांच्या धोरणांवर टीका केली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कमी ठेवावेत, अशी ट्रंप यांची इच्छा आहे. मात्र, ती मान्य करण्यास पॉवेल यांनी नकार दिल्याने ट्रंप यांनी त्यांना पद सोडण्याची सूचना केली होती, असे अमेरिकेतील वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत आता महागाईची समस्या नाही. त्यामुळे मध्यवर्ती फेडरल बँकेने व्याजदर अधिक ठेवण्याची आवश्यकता नाही, असे ट्रंप यांचे म्हणणे आहे. अखेर या वादामुळे पॉवेल यांनी पद सोडल्यानंतर त्यांच्यास्थानी वॉर्श यांची नियुक्ती करण्याचा आदेश प्रशासनाने दिला. वॉर्श लवकरच आपल्या पदाची सूत्रे घेत आहेत. वॉर्श हे आर्थिक सल्लागार, गुंतवणूक बँकर, आर्थिक धोरणतज्ञ मानले जातात. गेली दोन दशके त्यांनी अमेरिकेचे पतधोरण आणि आर्थिक धोरण ठरविण्यात महत्वाची भूमिका साकारली आहे. ते ट्रंप यांच्या विश्वासातील मानले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे ट्रंप यांची धोरणात्मक सोय झाल्याचे मानण्यात येते.