भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या महिलेला समज
यापुढे कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
बेळगाव : एकीकडे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेच्या नाकीनऊ येत आहे. तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांना मांसाहार व इतर खाऊ पदार्थ टाकले जात असल्याने कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही बाब गांभीर्याने घेत नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट परिसरात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या एका महिलेला रविवारी मनपा व पोलिसांनी तंबी दिली. यापुढे कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांकडून शाळकरी मुले, महिला व वृद्धांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विचार करण्याची वेळ आली आहे. कुत्र्यांचे कळप जिकडे तिकडे फिरत असून, त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. सध्या मनपा पशुसंगोपन विभागाकडून भटक्या कुत्र्यांना अँटीरेबीज लस टोचली जात आहे. त्यामुळे निर्बीजीकरण मोहीम थंडावली आहे. कुत्र्यांसाठी के. के. कोप येथे शेल्टर उभारण्याचे निश्चित झाले असून, शेल्टर उभारण्यासाठी मनपाकडून निविदा देखील मागविण्यात आली आहे.
मांसविक्री दुकानदारांना इशारा
पण, दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, चावा घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोणीही कुत्र्यांना मांस किंवा इतर प्रकारचे अन्न देऊ नये, असा आदेश यापूर्वीच मनपाकडून बजावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मांसविक्री दुकानदारांनाही इशारा देण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक शंकर पाटील यांनी आपल्या प्रभागात एक महिला कुत्र्यांना खाऊ घालत आहे, अशी तक्रार छायाचित्रासह मनपाकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पर्यावरण अभियंत्यांनी वरिष्ठ पशु निरीक्षक राजू संकण्णावर यांना स्वत: जागेवर जाऊन पाहणी करण्यासह अहवाल देण्याची सूचना केली होती. आदेशाची प्रत मिळताच राजू संकण्णावर यांनी रविवारी सकाळी प्रभाग क्र. 7 मधील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ती महिला कोठेच दिसून आली नाही. पण त्यांनी सदर महिला दिसून येताच आपणाला माहिती कळविण्यात यावी, असे सांगितले होते.
उलट अधिकाऱ्यांनाच दिला दम
समादेवी गल्ली येथे सदर महिला कुत्र्यांना खाऊ घालत आहे, असे समजताच संकण्णावर यांनी त्या ठिकाणी धाव घेत महिलेला सूचना केली. मात्र, उलट त्या महिलेनेच राजू संकण्णावर यांना दम देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही माहिती खडेबाजार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी समादेवी गल्लीत धाव घेत कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या महिलेला यापुढे कुत्र्यांना खाऊ दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देत तिचे छायाचित्र घेतले. त्यानंतर सदर महिला तेथून निघून गेली.