बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाला ताकीद
वृत्तसंस्था, सिल्हेट
नुकत्याच झालेल्या यजमान बांगलादेश आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शनिवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात खेळताना बांगलादेश संघाची कर्णधार निगार सुलताना जॉटी हिने आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचा भंग केला. मात्र तिला या गुन्ह्याबद्दल शिस्तपालन समितीकडून ताकीद देवून सोडण्यात आले.
सदर माहिती आयसीसीतर्फे प्रसिद्ध करण्यात आली. या सामन्यावेळी बांगलादेशची कर्णधार सुलतानाने क्रिकेट साहित्याचा तसेच गणवेश आणि मैदानावरील सुविधा संदर्भात थट्टा केल्याचे आढळून आले. आपल्या संघातील खेळाडूंसमवेत चर्चा करताना या टिपणी तिने केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय सामन्यात तिच्याकडून आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने हे प्रकरण आयसीसीच्या चौकशी समितीसमोर सोपविण्यात आले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील सुलतानाकडून हा पहिला गुन्हा घडला असल्याने तिला ताकीद देवून सोडण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना कर्णधार सुलताना लवकर बाद झाली. तिने पॅव्हेलीयनकडे जात असताना हातातील बॅट मैदानावर फेकली. तिच्याकडून क्रिकेट साहित्याचा अवमान झाल्याचे आढळून आले. सुलतानाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.