मनपा कंत्राटदारांचा अधिकाऱ्यांना इशारा
महिन्याभरात बिले दिली नाहीत तर आंदोलन; दीड वर्षापासून कंत्राटदारांची बिले थकीत
बेळगाव : विविध योजनांतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कामे केली. मात्र त्याची बिले देण्यास टाळाटाळ सुरू असल्यामुळे बेळगाव महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने मंगळवारी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या आहेत. महिन्याभरात आपली बिले द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्हाला बिलेच मिळाली नाहीत. महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, गटारी व इतर कामे केली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळीही आमच्याकडून कामे करवून घेण्यात आली. मात्र आजपर्यंत त्याची बिलेच देण्यात आली नाहीत. जवळपास 5 कोटी रुपये बिल येणे बाकी आहे. याबाबत महानगरपालिकेकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत व 15 व्या वित्त आयोगअंतर्गत कामे केली आहेत. याचबरोबर प्रभागातील कामेही करण्यात आली असून बिले देण्यास मात्र टाळाटाळ सुरू आहे. महानगरपालिकेबरोबरच इतर सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून आम्ही कामे केली असून ती रक्कमदेखील मोठी आहे. जवळपास 25 कोटीहून अधिक बिले आम्हाला जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायतींनी देणे बाकी आहे. ही सर्व बिले तातडीने द्यावीत, अन्यथा एक महिन्यानंतर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजू पद्मण्णावर, मारुती पुजार, अर्जुन कडोली, लक्ष्मण लगमण्णा, संतोष गुडस, अनिल दंडगल यांच्यासह इतर कंत्राटदार उपस्थित होते.