अन्यथा कृषी दिनी उपोषणाला बसू !
पिंगुळीतील शेतकऱ्यांचा कुडाळ तहसीलदारांना इशारा
कुडाळ -
पी.एम किसान योजने अंतर्गत मिळणारे अनुदान गेली दोन वर्षे बंद झाल्याने पिंगुळी येथील शेतकऱ्यांनी कुडाळ तहसीलदार यांची भेट घेत आम्हाला न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनुदान बंद झाले, असा आरोप करून न्याय न मिळाल्यास 1 जुलै या कृषी दिनी उपोषणाला बसण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
पी.एम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.याबाबतचा प्रस्ताव ऑनलाईन सादर करून या योजनेचा लाभ मिळत नाही.याबाबतचे कारणही स्पष्ट होत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक शेतकऱ्याना या योजनेचा मिळत असलेला लाभ बंद झाला आहे.पिंगुळी गावातील बहुतांशी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळत होता. परंतु गेली दोन वर्षे हे अनुदान बंद झाले आहे.शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी हेलपाटे मारूनही या अनुदानापासून वंचित राहिलेल्या या गावातील शेतकऱ्यांनी सरपंच अजय आकेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं . माजी सदस्य विष्णू धुरी, ग्रा. प. सदस्य शशांक पिंगुळकर यांच्यासह गुरूनाथ पिंगुळकर,भास्कर तळवणेकर, प्रकाश पिंगुळकर, रविकांत धुरी ,प्रकाश मिशाळ,गुरूनाथ मेस्त्री ,बाबुराव धुरी आदीं शेतकऱ्यांनी कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्याया बाबत त्यांच्याशी चर्चा केली.तसेच निवेदन सादर केले. आम्ही खाली सही करणारे लाभार्थी आम्हाला पी एम किसान योजनेची रक्कम नियमित मिळत होती परंतु महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला शासनाच्या योजनेतुन मिळणारे अनुदान मागील दोन वर्षांपासून बंद झाले आहे. या विषयी आम्ही वारंवार शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारूनही दखल घेतली गेली नाही. आम्हाला सदर अनुदानपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आपण लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आम्ही वंचित असणारे ग्रामस्थ दि. ०१ जुलै कृषी दिनाच्या दिवशी उपोषणास बसणार आहोत.या निवेदनाचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देण्याची तजवीज करावी,असे निवेदनात म्हटले आहे.