For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळाची चाहूल

06:51 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळाची चाहूल
Advertisement

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात मान्सून अर्थात मोसमी पावसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना, शेतीच्या भरण, पोषणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर परिणाम करणाऱ्या मान्सूनच्या प्रवासात यंदा एल निनोचे विघ्न येण्याची दाट चिन्हे आहेत. ही दुष्काळाची चाहूलच म्हटली पाहिजे.

Advertisement

यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या मान्सूनच्या कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज चिंता वाढवणाराच म्हटला पाहिजे. या वर्षी मान्सून अर्थात नैत्य मोसमी पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार असून, देशभर सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशात अवर्षणाच्या स्थितीची शक्यता 35 टक्के, तर सरासरीपेक्षा कमी 31, सर्वसाधारण पाऊस 27, अतिरिक्त पाऊस 6, तर अतिवृष्टीची शक्यता 1 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे. अवर्षणाचे ढग दाटत चालल्याचीच ही नांदी ठरावी. जून ते सप्टेंबरदरम्यान दरवर्षी साधारणपणे 87 सेंमी इतका पाऊस होतो. सध्या प्रशांत महासागरातील ला निनो म्हणजेच थंड पाण्याचे प्रवाह कमकुवत होत आहेत. तर मान्सूनच्या कालावधीत एल निनो अर्थात गरम पाण्याचे प्रवाह विकसित होण्याची शक्यता आहे. खरे तर पाऊसपाण्याच्या दृष्टीने एल निनो हा घटक अतिशय महत्त्वाचा मानला जातो. एल निनो काळात समुद्राचे तापमान अनैसर्गिकरीत्या वाढते. वातावरण सामान्यपेक्षा उष्ण होते. त्याचबरोबर वाऱ्याची दिशा व दाब बदलून हवामानावर तसेच मोसमी वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. एल निनोमुळे हिंदी महासागराकडून येणारे वारे कमकुवत होण्याची शक्यता असल्याने भारतात नैत्य मोसमी पावसावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता संभवते. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला, तर एल निनो स्थिती असताना भारताला अनेकदा दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची उदाहरणे आहेत. मागची काही वर्षे पाऊस पाण्याच्या दृष्टीने चांगली गेली, यात संदेह नाही. गतवर्षी देशभरात सरासरीच्या 108 टक्के पावसाची नोंद झाली होती. परंतु, हा आकडा खरोखरच 92 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर काय परिस्थिती उद्भवेल, याची कल्पनाच केलेली बरी. चांगल्या पावसानंतरही यंदा अनेक शहरांमध्ये पाणीटंचाई असून, स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाणीकपात करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या बाजूला अनेक भागांत भूजल पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्याचे चित्र दिसते. हे पाहता पावसाने ओढ दिल्यास हे वर्ष पाणीबाणीचे ठरण्याचा धोका स्पष्टपणे दिसतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या बहुतांश भागात पावसाची तूट जाणवू शकेल. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान गुजरातचा बहुतांश भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड व अंदमान बेटांच्या बहुतांश भागातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता सर्वच राज्यांना अॅलर्ट रहावे लागेल. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्यासह पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल. तसेच पाणीगळतीसाठीही आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. भारतासारख्या देशात आजही 60 ते 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. या शेतीचे भरण आणि पोषण होते, ते मान्सूनच्या पावसावरच. तथापि, पावसाने ताण दिला, तर त्याचा शेती आणि उत्पादनावर पर्यायाने रोजगारावही परिणाम होऊ शकेल. भारतीय अर्थव्यवस्थेकरिताही मान्सून उपकारक ठरत असतो. परंतु, मोसमी पावसामुळे निसर्गचक्राला फटका बसला, तर अर्थचक्राच्या गतीलाही ब्रेक लागण्याची भीती असेल. स्कायमेट या खासगी संस्थेनेही आपला अंदाज जाहीर केला असून, त्यातही सरासरीच्या 94 टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच यंदाच्या हंगामात पाऊस कमी पडणार, असेच लक्षण दिसते. पावसाचा ताण आणि दुष्काळ हे तर समीकरणच. त्यामुळे दुष्काळ गृहित धरूनच आत्तापासून शासन, प्रशासनाला पावले उचलावी लागतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.