युरोपियन देशांमधून आयात वाहनांवर 25 टक्के कर लागू करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इराण युद्धात अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प युरोपीय देशांवर नाराज आहेत. आता, आपल्या रागाच्या भरात ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर ‘टॅरिफ’चा बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी युरोपमधून येणाऱ्या कार आणि ट्रकवर 25 टक्के इतका मोठा कर लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत उद्योग आणि कामगारांच्या हिताचे रक्षण होईल, असा युक्तिवाद ट्रम्प यांनी केला आहे. या घोषणेमुळे प्रमुख युरोपीय कार उत्पादकांमध्ये घबराट पसरली असून, याचा जागतिक बाजारपेठेवरही परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यापासून युरोपियन युनियन (इयू) मधून येणाऱ्या वाहनांवरील कर 25 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल अशी घोषणा केली. ट्रम्प यांच्या मते, युरोपियन युनियन पूर्वी मान्य केलेल्या व्यापार कराराचे पालन करत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर युरोपीय कंपन्यांनी अमेरिकेत कार आणि ट्रकचे उत्पादन केले, तर त्यांच्यावर कर आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत सध्या 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीसह अनेक नवीन ऑटोमोबाईल आणि ट्रक कारखाने उभारले जात आहेत. अमेरिकेत यापूर्वी कधीही एवढी मोठी गुंतवणूक आणि विकास झालेला नाही. हे कारखाने अमेरिकन लोकांना रोजगार देतील, असा दावा त्यांनी केला.
जर्मनी, फ्रान्सला मोठे नुकसान शक्य
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे युरोपीय अर्थव्यवस्थेतील, विशेषत: जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांमधील ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठे नुकसान होऊ शकते. शुल्कवाढीमुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत युरोपीय वाहने अधिक महाग होणार असल्यामुळे त्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. याचा कंपन्यांच्या नफ्यावर आणि उत्पादनावर थेट परिणाम होईल. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, निर्यात कमी झाल्यास युरोपीय कंपन्या उत्पादन कमी करू शकतात, ज्यामुळे रोजगारावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, निर्यातीतील घट युरोपीय आर्थिक वाढही मंदावू शकते.
अमेरिकेत महागाई वाढण्याची संभावना
या निर्णयाचा अमेरिकेवरही परिणाम होईल. अमेरिकन ग्राहकांना युरोपीय गाड्यांसाठी जास्त किंमत मोजावी लागेल. तसेच वाहन खरेदीतील पर्यायही मर्यादित होऊ शकतात. युरोपीय संघ प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क वाढवू शकतो, अशी भीती आहे. ट्रम्प यांच्या या नव्या घोषणांची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्यास या वादाचे रुपांतर पूर्ण-प्रमाणातील व्यापार युद्धात होऊ शकते. साहजिकच यातून दोन्ही बाजूंना नुकसान होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.