सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीसाठी उच्च समुद्री लाटांचा इशारा जारी केला असून, विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान 27 जुलै सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 29 जुलै रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमार, नौकाचालक तसेच किनारी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या ताज्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीवर पुढील दोन दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, किनारी भागात विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांना हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या इशाऱ्याची माहिती तातडीने सर्व मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था आणि संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्रातील परिस्थिती लक्षात घेऊन मच्छिमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावे तसेच हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटक आणि नौकाचालकांनीही समुद्रकिनाऱ्यावर अनावश्यक वावर टाळावा, उंच लाटांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.