वॉर्नर पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत
सिडनी थंडरचे करणार नेतृत्व
वृत्तसंस्था/ सिडनी
डेव्हिड वॉर्नरची बुधवारी बिग बॅश लीगमधील संघ सिडनी थंडरचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील बॉल टेम्परिंग प्रकरणामध्ये अडकल्यानंतर सहा वर्षांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत वॉर्नरने पुनरागमन केले आहे.
वॉर्नरवर नेतृत्व भूषविण्याच्या बाबतीत घातलेली आजीवन बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात रद्द केली होती, ज्यामुळे त्याने स्पर्धात्मक क्रिकेटला अलविदा करण्यापूर्वी कर्णधारपद भूषविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. जूनमध्ये कॅरेबियनमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया बाद झाल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली होती.
नेतृत्वाच्या भूमिकेत परतणे हा वॉर्नरसाठी खूप मोठा क्षण आहे आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने अनेक विजय मिळवून देणाऱ्या या सलामीवीराचे महत्त्व कमी झालेले नाही. ‘या मोसमात थंडरचे पुन्हा कर्णधार बनणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी सुऊवातीपासूनच संघाचा भाग रहिलो होतो आणि आता माझ्या नावापुढे जोडलेल्या कर्णधारपदामुळे परत येणे विलक्षण वाटते. मी नेतृत्व करण्यास उत्सुक आहे’, असे वॉर्नरने म्हटले आहे. त्याने यंदाच्या मोहिमेपूर्वी थंडरचा कर्णधार म्हणून अष्टपैलू ख्रिस ग्रीनची जागा घेतली आहे.