जेपीएस प्रणालीमुळे लागला वारणा नदीतील अपघातग्रस्त चारचाकीचा शोध; चालक बेपत्ता
घुणकी वार्ताहर
पुणे- बंगलूर महामार्गांवर घुणकी कनेगाव दरम्यान चारचाकी गाडी वारणा नदी पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. रात्री क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली मात्र चालकाचा ठावठिकाणा लागला नाही. नजीर अहमद मेहबूब कांकनडगी (वय ४० सध्या रा.कुंडलवाडी ता. वाळवा जि. सांगली) असे बेपत्ता झालेल्या चालकाचे नाव आहे.
नजीर कांकनडगी हा सेंट्रींगचे कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होता. तो बुधवारी रात्री आठच्या दरम्यान तो काही लोकांना सोडण्यासाठी आपली चारचाकी (क्रमांक एमएच १० बीएम-८४२८) घेऊन कोल्हापूरला गेला होता. त्यांना सोडून परत देत असताना रात्री बारा वाजता वारणा नदीच्या पुलाच्या वळणावर आला. पुलाच्या सुरवातीच्या उजव्या बाजूच्या पहिल्याच कठड्याला जोराची धडक बसल्याने कठडे तोडून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीला जीपीएस प्रणाली असल्याने त्याद्वारे शोध सुरू केला.त्यात त्यांना गाडी वाठार उड्डाणपुलाखालून घुणकीच्या दिशेने गेल्याचे आढळल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली.
यासंदर्भात शोधमोहीम चालवली असता वारणा नदीच्या पुलापर्यंत शेवटचे लोकेशन दाखविल्यामुळे नदीजवळ जाऊन बघितले असता पुलाचा कठडा तुटल्या असल्याचे आढळून आले तसेच त्याठिकाणी गाडीची मोडलेली हेडलाईट पडल्याने गाडी नदीत पडल्याची शंका बळावली. काही युवकांनी पुराच्या पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाण्यात गाडी असल्याचे आढळून आले. ही घटना वडगाव पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने गाडी वर काढण्यात आली मात्र त्यात चालक आढळुन आला नाही. रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे.