डूरंड रेषेवर युद्धसदृश स्थिती
पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर तालिबानचा कब्जा
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानचे सैन्य आणि तालिबान यांच्यात डूरंड रेषेवर युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेकडून पाकिस्तानच्या 16 सैनिकांची हत्या करण्यात आली होती. यानंतर पाकिस्तानच्या वायुदलाने अफगाणिस्तानाच्या पाकटीका आणि खोश्त प्रांतात हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे 50 जणांना जीव गमवावा लागला होता.
या हल्ल्यामुळे भडकलेल्या तालिबानने डूरंड रेषेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ले करत 19 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. याचबरोबर 2 पाकिस्तानी चौक्यांवर तालिबानने कब्जा केला आहे. इंग्रजांनी निर्धारित केलेल्या डूरंड रेषेला अफगाणिस्तानने मान्यता दिलेली नाही. यावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून तणाव आहे.
तालिबान अन् पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पाहता अफगाण नागरिकांना सीमावर्ती भागांमधून स्थलांतर करावे लागले. अनेक भागांमध्ये संघर्ष झाल्याचे पाकिस्तानी सैन्याने मान्य केले, परंतु एकच सैनिक मारले गेल्याचा दावा केला.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने डूरंड रेषेला काल्पनिक ठरविले आहे. 28 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या अशा भागांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत, जेथून अफगाणच्या भूमीला लक्ष्य केले जात होते, असे अफगाण संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तर अफगाण सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या पेटवून दिल्या आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात डूरंड रेषेवरून वाद आहे. अफगाणिस्तानच्या कुठल्याही सरकारने कधीच इंग्रजांकडून निश्चित करण्यात आलेल्या या सीमारेषेला मान्यता दिलेली नाही.