वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ
कार्तिकवारी तोंडावर : वारकऱ्यांमध्ये उत्साह
बेळगाव : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली कार्तिकवारी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. ग्रामीण भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. मजल-दरमजल पायी चालत विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेऊन वारकरीही सहभागी होऊ लागले आहेत. वारकऱ्यांचे माहेरघर असणाऱ्या पंढरपूरमध्ये कार्तिकवारीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात. बेळगाव परिसरातूनही वारीसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. एकीकडे सुगी हंगामाची धांदल सुरू आहे. त्यामुळे बळीराजा कामात मग्न झाला आहे. तर दुसरीकडे वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाचा लळा लागला आहे.
बेळगाव तालुक्यातील कर्ले गावातून दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. त्याबरोबर इतर गावातूनही दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपुरात आषाढी, कार्तिक, माघ आणि चैत्र महिन्यात यात्रा भरते. यामध्ये आषाढी वारीला सर्वाधिक भक्त दाखल होतात. विशेषत: बेळगाव परिसरातूनही कार्तिक वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: कार्तिक वारीला पंढरपुरात बैल, म्हैस आणि घोड्यांचा बाजार होतो. यासाठीही जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. सद्यस्थितीत पावसामुळे सुगी हंगामातील कामे लांबणीवर पडली आहेत. त्यातच कार्तिकवारी तोंडावर आली आहे. त्यामुळे वारीपूर्वी शेतातील काही कामे आटोपून पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची धडपड सुरू आहे.
12 नोव्हेंबर रोजी कार्तिकवारी
येत्या 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे. या दिवशी विविध विठ्ठल मंदिरांतून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याबरोबर भजन कीर्तन यानिमित्त टाळमृदुंगाचा गजर घुमणार आहे.
बेळगाव-पंढरपूर रेल्वे सुरळीत करावी
कार्तिकवारीसाठी बेळगावातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने बेळगाव पंढरपूर मार्गावर रेल्वेसेवा सुरळीत सुरू ठेवावी. अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी वारीच्या काळात रेल्वेसेवा सुरळीत रहावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.