Vari Pandharichi 2025: वारकरी संप्रदाय
Vari Pandharichi 2025 :
संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।
संत ज्ञानदेव आणि नामदेव पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अधिष्ठान दिले. संप्रदायाला निश्चित स्वरूप दिले. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वत:ची कीर्तनपद्धती निर्माण केली. संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रे व स्वत:चे चरित्र आत्मचरित्र लिहून एकप्रकारे दस्तऐवजीकरण डॉक्युमेंटेशन केले.
ज्ञानदेव नामदेव काळात संत गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानकाका, सोयराबाई, विसोबा खेचर, परिसा भागवत ही संत मंडळी या संत मांदियाळीत होती.
पुढे संत एकनाथ महाराजांनी संप्रदायाला भागवत ग्रंथ रुपी खांब दिला. संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांच्या काळात संताजी जगनाडे, रामेश्वर भट्ट वगैरे तुकोबांचे सहकारी होते. तुकोबांच्या पश्चात झालेले संत निळोबाराय हे वारकरी परंपरेतील शेवटचे संत होते. तुकोबांच्या शिष्या असलेल्या आणि ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहभाग लाभला त्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या.