For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालगाव हल्ल्यात तुरमुरीचे वारकरी जखमी

11:32 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मालगाव हल्ल्यात तुरमुरीचे वारकरी जखमी
Advertisement

वारकरी संप्रदायमधून संताप : महाराष्ट्र शासनाने ‘त्या’ गुंडटोळीवर कारवाई करण्याची मागणी 

Advertisement

वार्ताहर/उचगाव

तुरमुरी येथील वारकरीमंडळी पंढरपूरची आषाढी एकादशी संपवून परत येत असताना मालगाव (ता. मिरज) येथे शुल्लक कारणावरून काही गुंडांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका पंचायतचे माजी सदस्य व तुरमुरी ग्रा. पं. माजी अध्यक्ष सुरेश राजूकर यांसह चौघे गंभीर जखमी झाले. यामधील एकजण बेशुद्धावस्थेत असल्याची घटना घडल्याने तुरमुरी, तसेच या भागातील सर्व वारकरी संप्रदायमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने या गुंडटोळीवर तातडीने कारवाई करावी आणि वारकरीमंडळींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

या घटनेची अधिक माहिती अशी की, तुरमुरी गावातून वारकरीमंडळी दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी एकादशीला जात असतात. नेहमीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी संपवून परतीच्या मार्गावर असताना मिरजजवळील मालगाव या ठिकाणी आल्यानंतर वारकरी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून मिरजमार्गे बेळगावकडे निघाले होते. परंतु महामार्गावरून मिरजकडे येत असताना वारकऱ्यांचा रस्ता चुकल्याने ते मिरज तालुक्यातील मालगाव या गावात गेले. मालगावातील एका अऊंद रस्त्यावरून वारकऱ्यांचा ट्रक (केए 22 डी 8535) निघाला होता. त्यावेळी गावातील एका कारचालकाचा वारकऱ्यांच्या ट्रकचालकाशी साईड काढण्यावरून वाद झाला. त्यानंतर ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर हे जास्त काही न बोलता आपला ट्रक घेऊन मिरजेच्या दिशेने वापस येऊ लागले. त्यावेळी मालगावमधील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या पन्नास साथीदारांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक मालगाव ते मिरज रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे अडविला. कुऱ्हाडीचा दांडा आणि ट्रकवर लावलेल्या झेंड्यांच्या काठ्यांनी वारकऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत समितीचे नेते सुरेश राजूकर, परशराम जाधव आणि ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर हे तिघे गंभीर जखमी झाले. यापैकी परशराम जाधव बेशुद्धावस्थेत होते. या सर्वांना मिरज शासकीय ऊग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महिलांनाही मारहाण

या ट्रकमध्ये तुरमुरी गावातील महिलांचाही सहभाग होता. यामध्ये काही महिला वयस्क होत्या. मात्र त्यांनाही त्यांनी सोडले नाही. तसेच लहान मुलेही यामध्ये होती. या गावगुंडांनी ट्रकमध्ये बसलेल्या महिलांनाही मारहाण केल्याचे महिलांनी सांगितले. तसेच त्यांचे केस धरून ओढणे, मुलांना बुक्क्यांनी हाणणे, असे प्रकार यावेळी झाल्याने महिला भयभीत झाल्या होत्या. या भागातील वारकरी संप्रदायच्यावतीने घटनेचा निषेध करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने मालगावातील गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि सीमाभागातील सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेळगावच्या पश्चिम भागातील वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे.

आता वारकऱ्यांना संरक्षणही द्यावे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वारकरी दिंड्यांना अनुदान जाहीर केले. तसेच कर्नाटकातील सीमाभागातील वारकरीमंडळी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला अनेक वाहनांतून ये-जा करत असतात. अशा सर्व वारकऱ्यांना संरक्षणही द्यावे, अशी तमाम वारकरी संप्रदायाच्यावतीने आम्ही विनंती करीत आहोत.

-सुरेश राजूकर

Advertisement
Tags :

.