मदतीच्या बहाण्याने तरुणीला नेले; वर्धा रेल्वे स्थानक परिसरात केला सामूहिक अत्याचार; 5 जण अटकेत
वर्धा : वर्धा रेल्वे स्थानक परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तपासाला वेग देत ऑटोचालकासह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी चंद्रपूर येथून परतत असताना सेवाग्राममार्गे वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली. रात्री उशिरा स्थानक परिसरात असताना एका ऑटोचालकाने तिला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर तरुणी पुन्हा रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली. त्यानंतर काही संशयितांनी तिला पुन्हा बाहेर नेल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे ऑटोचालकासह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांकडून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, घटनेशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जात आहे. आरोपींविरुद्धचे आरोप तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.