For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारकऱ्यांना आस विठुरायाची अन् विशेष रेल्वेचीही!

08:25 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
वारकऱ्यांना आस विठुरायाची अन् विशेष रेल्वेचीही
Advertisement

आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वेची मागणी

Advertisement

बेळगाव : पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात आहेत. आषाढी एकादशीला बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवार या परिसरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात. मागील अनेक वर्षांपासून हुबळी-पंढरपूर या मार्गावर विशेष रेल्वे सोडली जाते. परंतु, मागील दोन वर्षांपासून पंढरपूरला यात्राकाळात विशेष रेल्वे सोडण्यात न आल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे यावर्षी तरी नैर्त्रुत्य रेल्वेला वारकऱ्यांची हाक ऐकू येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी दररोज दोन एक्स्प्रेस उपलब्ध होत्या. दुपारी 2.30 वाजता बेळगाव-पंढरपूर तर सायंकाळी 4 वाजता चिक्कजाजूर-परळी या मार्गावर रेल्वे उपलब्ध होती. परंतु, 2020 च्या कोरोना साथीनंतर या दोन्ही रेल्वे बंद करण्यात आल्या, त्या आजतागायत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. दुपारची बेळगाव-पंढरपूर एक्स्प्रेस वारकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरत होती. त्यामुळे ही एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील त्याकडे नैर्त्रुत्य रेल्वेने लक्ष दिलेले नाही.

किमान विशेष रेल्वे सोडा

Advertisement

आषाढी एकादशी अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे. दरवर्षी हुबळी-पंढरपूर या मार्गावर यात्राकाळासाठी विशेष रेल्वे सोडली जात होती. यापूर्वीचे जनसंपर्क अधिकारी अनिमिष हेगडे यांच्या प्रयत्नातून हुबळी-पंढरपूर यात्रा स्पेशल एक्स्प्रेस सोडण्यात आली होती. त्यामुळे यावर्षीही यात्राकाळात ही एक्स्प्रेस पुन्हा सोडण्याची मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे.

दैनंदिन एक्स्प्रेस पूर्ववत करा

आषाढी एकादशीला बेळगावसह परिसरातून शेकडो भाविक पंढरपूरला ये-जा करीत असतात. बसपेक्षा रेल्वेप्रवास वारकऱ्यांना सोयीचा ठरत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे सुरू करावी. तसेच बेळगाव-पंढरपूर दैनंदिन एक्स्प्रेस पूर्ववत करण्याची मागणी लवकरच रेल्वे विभागाकडे केली जाणार आहे.

-शंकर बाबली, अध्यक्ष, बेळगाव जिल्हा वारकरी भाविक सेवा संघ

Advertisement
Tags :

.