Masur LPG shortage | युद्धाची झळ मसूरच्या उंबरठ्यावर! घरगुती गॅससाठी ज्येष्ठ नागरिक अन् महिलांच्या लांबच लांब रांगा
मसूरमध्ये गॅसचा 'काळबाजार' जोरात?
मसूर -युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. त्याची झळ मसूर परिसरातील नागरिकांना बसू लागली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना तासन् तास उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील इण्डेण गॅस एजन्सीसमोर दररोज सकाळपासून ग्राहकांची गर्दी होत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.अनेकांनी अगोदर बुकिंग केलेले असतानाही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असून वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.
परिसरात अनेक शैक्षणिक संकुले असल्याने हजारो विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. हे विद्यार्थी हॉटेल व मेसवर अवलंबून आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि काळ्या बाजारामुळे हॉटेल व्यावसायिकांना स्वस्तात गॅस मिळत नसल्याने स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. गॅस वितरण व्यवस्थेतील अपुरी माहिती व ग्राहकांतील संभ्रमामुळे नाराजी वाढली आहे. गॅस वितरण केंद्रात गेल्यानंतर केवायसी पूर्ण नसल्याचे सांगितले जात असल्याने ग्राहकांना पुन्हा प्रक्रिया करावी.
काळ्या बाजारात विक्रीघरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असताना काळ्या बाजारात बिक्री होत असल्याचा आरोप होत आहे. काही व्यावसायिक आणि हॉटेल्सना प्राधान्याने सिलिंडर दिले जात असल्याचीही तक्रार आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरचा गैरवापर होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अनेक ग्राहक घरबसल्या ऑनलाइन गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ओटीपी न आल्याने बुकिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्राहकांना गॅस एजन्सीत रांगेत उभे राहावे लागत आहे.