तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये वाक्युद्ध
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे दोन वरिष्ठ खासदार महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी पुन्हा उघडपणे आमने-सामने आले आहेत. कोलकाता लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून कल्याण बॅनर्जी यांच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे हा संघर्ष सुरू झाला आहे. परंतु आता हा वाद वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे. महुआ यांनी 40 वर्षांचा विवाह तोडला आणि आता त्या मला नैतिकता शिकवत आहेत अशी कठोर टिप्पणी कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे.
महुआ हनिमूनमधून परतल्यावर माझ्याशी भांडण्यासाठी आल्या आहेत. मला त्या नारीविरोधक ठरवत आहेत. महुआ यांनीच एक 40 वर्षे जुना विवाह मोडला आणि 65 वर्षीय व्यक्तीशी विवाह केला, या कृत्यामुळे संबंधित महिलेला ईजा पोहोचली नसावी का अशी प्रश्नार्थक टिप्पणी बॅनर्जी यांनी केली आहे.
महुआ मोइत्रा यांनी अलिकडेच बीजदचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी विवाह केला आहे. ज्या खासदार संसदेतून नैतिकतेच्या उल्लंघनावर बडतर्फ झाल्या आहेत, त्या मला ज्ञान देत आहेत, प्रत्यक्षात महुआ याच सर्वाधिक महिलाविरोधी आहेत. त्यांना केवळ स्वत:चे भविष्य अन् पैसे मिळविणे जमते, अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे.
तत्पूर्वी बॅनर्जी यांनी कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणावर टिप्पणी करत पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आपण कुणासोबत जातोय याचा विचार लोकांनी करायला हवा, असे बॅनर्जी यांनी पीडितेसंबंधी बोलताना म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चहुबाजूने टीका झाली होती.
भारतात स्त्राrद्वेष सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. परंतु अशाप्रकारच्या घृणास्पद टिप्पणीची निंदा तृणमूल काँग्रेस करत असतो, असे म्हणत महुआ मोइत्रा यांनी बॅनर्जी यांना लक्ष्य केले होते. यापूर्वी दोन्ही नेते 4 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात परस्परांना भिडले होते. त्यावेळी महुआ मोइत्रा यांचे नाव तृणमूल काँग्रेसच्या निवेदनातून हटविण्यात आले होते, ज्यानंतर महुआ मोइत्रा भडकल्या होत्या. तसेच एक व्हॉट्सअप चॅट लीक झाला होता, ज्यात बॅनर्जी यांनी महुआ यांना ‘वर्सटाइल इंटरनॅशनल लेडी’ असे उपरोधिक स्वरुपात संबोधिले होते.