सिद्धरामय्या-शिवकुमारांमध्ये ‘शब्दयुद्ध’
नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून एकमेकांना उद्देशून शेरेबाजी
प्रतिनिधी/ बेंगळूर
सत्ताधारी काँग्रेस सरकारमधील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात ‘शब्दयुद्ध’ सुरू झाले आहे. सिद्धरामय्यांनी हायकमांडवर आपल्याला विश्वास असल्याचे म्हटले आहे, तर डी. के. शिवकुमार यांनी वेळच उत्तर देईल, असे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत हायकमांडकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर हायकमांडच्या निर्णयाशी कटिबद्ध राहणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सातत्याने पुनरुच्चार केला होता. आताही त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली आहे.
बुधवारी बेंगळूरच्या शक्तीभवनमध्ये अर्थसंकल्पपूर्व बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी, अधिकार वाटपाच्या मुद्द्यावर हायकमांडचा निर्णयच अंतिम आहे. त्यानुसारच मी आणि शिवकुमारांनी वागले पाहिजे. सर्वांनी हायकमांडच्या निर्णयाशी बांधील असले पाहिजे, असे सांगितले. पत्रकारांकडून सातत्याने नेतृत्व बदलावर प्रश्न विचारण्यात येत असल्याने ते भडकले.
वरिष्ठांच्या भेटीविषयी गुपित कायम
नेतृत्व बदलासह सर्व मुद्द्यांवर वेळच उत्तर देईल, असा पुनरुच्चार डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार यांनी कोणकोणत्या नेत्यांची भेट घेतली, याचे गुपित उघड केले नाही. दिल्लीतील नेत्यांनी मला भेटीसाठी स्वत:हून वेळ दिलेली नाही, असेही ते म्हणाले. संथपणे का होईना, पण सिद्धरामय्या हे दिलेला शब्द पाळतील, असे वक्तव्य माजी खासदार व डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी केले आहे. या वक्तव्यावरून पत्रकारांनी दिल्लीत शिवकुमार यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर शिवकुमार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना वेळच उत्तर देईल, इतके सांगून त्यांनी अधिक भाष्य टाळले.