For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदे सेनेतील ‘वॉर’

06:31 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिंदे  सेनेतील ‘वॉर’
Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार हे कायम कोणत्या ना कोणत्या वादाच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे विधानभवनात घडलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे व शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील कथित ‘वॉर’ हे आश्चर्यकारक मानता येणार नाही. शिंदेसेनेची निर्मिती हीच मुळात बंडखोरीतून झाली आहे. त्यामुळे बंडखोरीचा असा जाज्वल्य इतिहास लाभलेल्या संघटनेतील लोकप्रतिनिधी बंडखोर वृत्तीचे असणे, हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांना तर आद्यप्रवर्तक हीच उपाधी द्यावी लागेल. पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड, भोजन व्यवस्थापकास मारहाण, ऊग्णालयाच्या डॉक्टरला दिलेली धमकी, पोलिसांना शिवीगाळ व गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याच्या भाषेपर्यंत अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. संजय गायकवाड यांचाही समावेश अशाच कर्तृत्ववान आमदारांमध्ये होतो. शिवजयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या काठीने एका युवकास मारहाण केल्याचा त्यांचा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला आहे. वास्तविक गायकवाड यांचा पिंडच वादविवादपटूचा. शिकार केलेल्या वाघाचा दात गळ्यात घालण्यासोबत एका महिलेची शेती हडप केल्याचा आरोपही या महाशयांच्या नावावर आहे. असे शूरवीर प्रतिनिधी शिंदेसेनेला लाभत असतील, तर त्यांना कुणाची भीती बाळगण्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण होतो. अब्दुल सत्तार यांच्या प्रतिभेबद्दल काय बोलावे? उभ्या महाराष्ट्रात त्यांच्यासारखा नेता सापडणार नाही. सिल्लोडचे हे रत्न कधी काळी काँग्रेस, ठाकरे सेनेत होते. आता शिंदे गटात ते सक्रिय आहेत. मात्र, कुठेही गेले, तरी त्यांच्यातील स्वतंत्र बाणा कायम असतो. सुप्रिया सुळेंसंदर्भातील त्यांचे विधान, शेतकऱ्यास केलेली दमदाटी अशी काही उदाहरणे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर झोत टाकण्याकरिता पुरेशी ठरावीत. सदासर्वकाळ वादात असलेल्या एका आमदाराचे गोळीबारप्रकरणही मध्यंतरी चांगलेच गाजले होते. याप्रकरणात काडतुसे आणि बंदुकीचे नमुने तपास तपासले असता संबंधितांकडे त्याची सुई वळली होती. प्रत्यक्षात त्यांना क्लीन चीट दिली गेली. प्रकाश सुर्वे यांची हातपाय तोडायची भाषा, तानाजी सावंत यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांतून रसरसणारा उन्माद, गुलाबरावांच्या जिभेवरील भांगडा नृत्य, सौंदर्य पाहूनच प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेवर आदित्य ठाकरे यांनी नियुक्त केल्याचा संजय शिरसाट यांचा निष्कर्ष, अशी शिंदेसेनेतील आमदारांच्या नवोन्मेषी प्रतिभेची कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे अल्पावधीतच अशी समृद्ध परंपरा निर्माण करणाऱ्या शिंदेसेनेच्या दोन सहकाऱ्यांमध्ये विधिमंडळात संघर्ष होत असेल, तर तो त्यांच्या लौकिकास साजेसाच म्हणावा लागेल. मालेगावचे आमदार व मंत्री दादा भुसे हे सेनेचे जुनेजाणते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आमदार थोरवे म्हणे मागच्या दोन महिन्यांपासून एका कामासंदर्भात त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात मुख्यमंत्री व त्यांचे कार्यशील सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही त्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही भुसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी जाणीवपूर्व काम केले नाही. उलट थोरवे यांच्याशी उद्धटपणा केला व त्यातूनच वादाला फोडणी मिळाली, असे थोरवे सांगतात. परंतु, असा काही वाद झालाच नसल्याचा दादा भुसेंचा दावा आहे. शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडामध्ये जे आघाडीच्या फळीत होते, त्यापैकी दादा भुसे एक होत. आम्ही दोघे सहकारी मित्र आहोत. विधिमंडळात आमचा काहीच वाद झाला नाही, हे त्यांनी रंगवलेले गुलाबी चित्र म्हणजे उत्तम कलाविष्कारच ठरावा. त्याअर्थी या दोन मित्रांमधील प्रेमळ संवादास माध्यमांनी उगाच वादाचे रूप दिले, असेच म्हणता येईल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जोखडातून मुक्तता केली. सध्याच्या गतिमान सरकारचे प्रतिनिधीत्व तेच करीत आहे. जागतिक पटलावर शिंदे यांच्या बंडाची नोंद घेण्यात आली आहे. शिंदे घेणारे नाहीत, तर देणारे आहेत. शिंदे शेती करतात. उद्धव ठाकरेंसारखे घरी बसत नाहीत. सतत काम करतात. लोकांना भेटतात. ते केवळ दोन-पाच तासच झोप घेतात, अशा बऱ्याच वदंता आहेत. अशा उत्तुgंग व्यक्तिमत्त्वाच्या अनुयायांनी एकमेकांत भांडावे, विधानभवनात धुक्काबुक्की करावी, हमरीतुमरीवर यावे, हे काही शोभादायक म्हणता येणार नाही. शिंदे बऱ्याचदा शांतच असतात. सहसा चिडताना दिसत नाहीत. मात्र, एखादा अपवाद वगळता त्यांचे सर्वच लोकप्रतिनिधी कायम वैतागलेले, चिडलेले दिसतात. म्हणूनच अशा गुणी लोकप्रतिनिधींसाठी रागावर नियंत्रण कसे मिळवावे, शांतपणे कसे बोलावे, याबाबत शिंदे यांनी मार्गदर्शन शिबिर घेणे योग्य ठरेल. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजपा, शिंदेंची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीतील वातावरण भाजपाकरिता अनुकूल असेलही. मात्र, विजय गृहीत धरून शिंदेंचे हे शिलेदार ऊतमात करीत असतील, तर जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनीही ध्यानात घेतले पाहिजे. आता शिंदे सेना वगळता इतर पक्षातील सर्व प्रतिनिधी अतिशय जबाबदारीने बोलतात, विधिमंडळातील त्यांचे वर्तन आदर्श असते, असे म्हणणेही धारिष्ट्याचे ठरेल. काही लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे निवडून येतात, येत आहेत. मात्र, या काळात सभागृहाची शान राखतानाच लोकहितासाठीच ते कटिबद्ध राहिलेले दिसतात. अशा धोरणी, प्रगल्भ प्रतिनिधींमुळेच महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडे आदराने पाहिले जाते. मात्र, काही मंडळींच्या वर्तणुकीमुळे हा लौकिक इतिहासजमा होणार की काय, अशी भीती वाटते. भविष्यात अशा गोष्टी कशा टाळता येतील, याची खबरदारी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली पाहिजे. शिंदेंच्या सेनेला पक्ष मिळाला, चिन्ह मिळाले. विधानसभाध्यक्षांनीही त्यांच्या बाजूने निर्णय दिला. पण, लोकांचा पाठिंबा अजून मिळायचा आहे. असाच अॅटिट्यूड राहिला, तर जनादेश सोडून बाकी सगळे काही त्यांच्याकडे असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.