For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध आणि शांतता

06:45 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध आणि शांतता
Advertisement

रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांचा ‘वॉर अँन्ड पीस’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात टॉलस्टॉय यांनी शांततेचा पुरस्कार केला आहे. गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांच्यापासून जगभरातील अनेक महनीय व्यक्तींनी, विचारवंतांनी शांतता हेच अंतिम सत्य असल्याचे अधोरेखित केले आहे. हे पाहता जगातील बहुतांशांना शांतता प्रिय असली, तरी झगडा, युद्ध आणि युद्धखोरपणाची खुमखुमी असणाऱ्यांचीही कमी नाही, हे तितकेच खरे. अमेरिका, इस्रायलसारखे देश किंवा डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यान्याहूसारखी व्यक्तिमत्त्वे हा त्याचाच भाग. ट्रम्प यांच्या धरसोडपणा आणि धोरणसोडपणाचा अनुभव तर जगाने सातत्याने घेतला आहे. ट्रम्प यांनी आधी टॅरिफ लादला. मग आपल्या देशाला झळ बसायला लागल्यावर मागे घेतला. आता युद्धाच्या बाबतीतही त्यांचे हेच सुरू आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर पुढचे पाच दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे. आधी दोन, पाच दिवसांत युद्ध संपवू, इराणला बेचिराख करू, अशी भाषा करणाऱ्या या नेत्याचा स्वर इतका बदलावा, हे आश्चर्यकारकच म्हणता येईल. अर्थात त्यामागे निश्चित काही कारणे दिसतात. खरे तर युद्धस्थितीमुळे इंधन आणि

Advertisement

गॅसच्या स्तरावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक ठप्प झाल्याने इंधन व गॅसपुरवठा साखळी विस्कळित झाल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाल्याचे दिसून आले आहे. मागच्या काही दिवसांत महागाईही वाढत असल्याचे पहायला मिळते. सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात याची झळ बसल्याने अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने सगळ्यांनाच त्याची झळ बसू लागली. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसू लागले. त्यात अमेरिकेतही अंतर्गत राजकीय दबाव वाढू लागला. लोकांमध्येही असंतोष निर्माण होऊ लागला. परिणामी ट्रम्प यांनी पाच दिवसांचा विराम घेतला, असे म्हणण्यास वाव आहे. मागच्या दोन दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी कितीही म्हटले असले, तरी त्यामध्ये कितपत तथ्य आहे, असा प्रश्न पडतो. तसे असते, तर युद्धाआधीच चर्चेतून असा मार्ग निघाला असता. युद्धविरामानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळेल आणि हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी आशा व्यक्त केली जाते. मात्र, हा अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही, हेदेखील लक्षात घ्यावे लागेल. दुसरी बाब म्हणजे अमेरिकेने युद्धविश्रांती घेतली असली, तरी इस्रायलने आपला पवित्रा बदललेला नाही. त्यांनी इराणवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. तर इराणही प्रत्युत्तरवादी भूमिका कायम ठेवली आहे. ट्रम्प यांचे कुणी ऐकायला तयार नाही, असेच यातून दिसून येते. खरे तर युद्धविरामाबाबत इराणनेही सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेने प्रथम आक्रमक कारवाया थांबवाव्यात, आर्थिक निर्बंधांमध्ये शिथिलता आणावी, इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जावा, केवळ घोषणा नकोत, तर युद्धविरामाची प्रत्यक्ष कृती हवी, अशा त्यांच्या अपेक्षा दिसतात. हे पाहता खरेच युद्ध थांबेल का, हे पहावे लागेल. अमेरिका आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून अविश्वासाचे वातावरण आहे. हे वातावरण कायम असताना लगेच शांतता कशी नांदू शकेल? मध्यपूर्वेत अनेक देश या संघर्षात अप्रत्यक्षरित्या गुंतलेले आहेत. त्यामुळे युद्धविराम झाला, तरी तातडीने तो होईल का, याविषयीही साशंकता आहेत. उलट दोन्ही बाजूंनी सैन्य हालचाली सुरूच राहिल्या, तर पुढच्या टप्प्यात युद्ध आणखी भडकू शकते. म्हणूनच युद्ध खरोखरच थांबवायचे असेल, तर कथनी आणि करनीमधला फरक अमेरिका, इस्रायलसारखा देशांना आधी मिटवावा लागेल. अमेरिकेने युद्धविराम जाहीर करायचा आणि इस्रायलने युद्ध सुरूच ठेवायचे, यातून काहीच साध्य होणार नाही. काही विश्लेषकांच्या मते युद्धातून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. युद्ध सुरू करायचे आणि त्याच्या झळा बसायला लागल्यावर माघार घ्यायची, ही अमेरिकेची जुनी नीती आहे. मुळात कोणतेही युद्ध हे दिवाळखोरीकडे नेणारे असते. संबंधित देश, त्याची अर्थव्यवस्था कितीही मजबूत असेना. युद्धातून मानवी, आर्थिक व इतर स्वरुपाचे होणारे नुकसान भरून निघण्यास दीर्घ कालावधी लागतो. हे पाहता हळूहळू यातून अंग काढण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाप्रमाणे हे संकटही आव्हानात्मक असल्याकडे लक्ष वेधले आहे. देशवासियांनो मनाची तयारी करा. जागतिक युद्धामुळे उद्भवलेली स्थिती बराच काळ राहू शकते. आपण एकजुटीने जशी कोरोनावर मात केली. त्याप्रमाणे या संकटाशीही आपल्याला सामना करावा लागेल, असे पंतप्रधानांनी सूचित केले आहे. त्यातील मथितार्थ समजून घेतला पाहिजे. भारत हा इंधन वा गॅसच्या पातळीवर स्वावलंबी देश नाही. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीचा मागच्या काही दिवसांत आपल्यावर बराच परिणाम झाला आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर आगामी काळात समस्या वाढू शकतात. सर्वसामान्यांना त्याची झळ बसू शकते. हे ओळखून केंद्र सरकारला इंधन व गॅस पुरवठ्यासाठी नव्याने हालचाली कराव्या लागतील. विविध पर्यायांचाही विचार करावा लागेल. भारतानेही आजवर अनेकदा युद्ध आणि संघर्ष अनुभवले आहेत. पाकिस्तानसोबत आपली तीन मोठी युद्धे झाली. तर अनेकदा लढाया व संघर्ष झाला. पण, हे युद्ध आपल्यावर कायम लादले गेले. पाकने कुरापती काढल्याने आपण केवळ संरक्षण म्हणून प्रतिकार केला. आज अमेरिकेने अणू कार्यक्रमाचे निमित्त करून इराणवर युद्ध लादल्याचे पहायला मिळते. त्यामुळे सगळे जग वेठीस धरले गेले आहे. मात्र, युद्धाऐवजी शांततेचाच मार्ग जगाच्या हिताचा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.