वक्फ बोर्डची आता बैलहेंगल तालुक्यावरही नजर
शेती-घरांच्या उताऱ्यांवर चुकीच्या नोंदींमुळे ग्रामस्थ हवालदिल
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांची घरे, जमिनीवर वक्फ बोर्डचा अधिकार सांगून शेतकऱ्यांना घरे, जमिनी सोडण्याचा आदेश राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. वडिलोपार्जित घरामध्ये वास्तव्य करणारे, जमिनीमध्ये कसणारे शेतकरी या नोटिसीने हवालदिल झाले असून न्याय मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वक्फ बोर्डाची ही कारवाई बेळगावपर्यंत पोहोचली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील स्मशानभूमी, सरकारी जमीन, शेतजमिनीवर वक्फ बोर्ड आपला हक्क सांगत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. जो-तो आपल्या घर आणि शेताच्या उताऱ्यांची पडता ळणी करून खातरजमा करण्यात गुंतले आहेत.
संगोळ्ळी रायण्णांचे जन्मस्थळ संगोळी, मल्लम्मांची जन्मभूमी बेळवडी येथील स्मशानभूमीच्या उताऱ्यावर वक्फ बोर्डची नोंद झाली असून वक्फ बोर्डची झेप आता संपगावपर्यंत पोहोचली आहे. येथील सरकारी जमिनीवरही वक्फ बोर्ड आपला हक्क सांगत असल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
संपगाव येथील रि.स.नं. 390, हिस्सा 3 मधील 1 एकर 19 गुंठे जमीन ही सरकारी असून या जमिनीच्या उताऱ्यावर वक्फची मालमत्ता म्हणून नेंद झाली आहे. याच गावातील रि.स.नं. 390, हिस्सा 1 मधील 3 एकर 17 गुंठे सरकारी जमिनीवरही वक्फ बोर्डची नोंद झाली आहे. या जमिनीवर कल्लय्याअज्जा देवस्थान व गरडी यांचे घर अशी पूर्वापार नोंद आहे. आता या जमिनीवर वक्फ बोर्ड आपला हक्क सांगत असल्याने जमिनीचे मूळ मालक दिशाहीन झाले आहेत. न्याय मिळवून घेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.
गावातील सर्व शेतकरी व घरमालकांनी आपली शेतवडी, घरांच्या उताऱ्यावर आपले किंवा आपल्या सदस्यांच्या नावांची नोंद आहे, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन संपगाव ग्राम पंचायत अध्यक्ष व सदस्यांनी केले आहे.
शेती व घरांच्या उताऱ्यावर वक्फचे नाव असल्यास ते तत्काळ रद्द करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी महसूल खात्याला दिला आहे.