बंगालमध्ये लागू होणार नाही वक्फ कायदा
ममता बॅनर्जी यांची घोषणा : माझ्यावर विश्वास ठेवा असे वक्तव्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. केंद्राच्या वक्फ दुरुस्ती कायद्याला पश्चिम बंगालमध्ये लागू केले जाणार नाही असे ममतांनी म्हटले आहे. कोलकात्यात जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना अल्पसंख्याक लोक आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करणार असल्याचे उद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले आहेत.
वक्फ अधिनियम लागू झाल्याने लोक दु:खी आहेत हे मी जाणते. परंतु विश्वास ठेवा, धर्माच्या आधारावर बंगालमध्ये फूट पडू देणार नाही. बांगलादेशची सध्याची स्थिती पहा, वक्फ दुरुसती विधेयक सध्या संमत करविले जायला नको होते असे ममतांनी म्हटले आहे.
भले मला गोळ्या घातल्या तरीही मला एकतेपासून वेगळे करता येणार नाही. बंगालमध्ये कुठलेही विभाजन होणार नाही. जर कुणाला माझी संपत्ती घेण्याचा अधिकार नाही, तर अन्य कुणाची संपत्ती घेऊ शकेन असे मी कशी म्हणू शकते? आम्हाला 30 टक्के लोकांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागेल. दीदी तुमच्या संपत्तीचे रक्षण करेल हे लक्षात ठेवा असे उद्गार ममतांनी समुदायाला उद्देशून काढले आहेत.
मागील आठवड्यात गुरुवारी लोकसभेत तर शुक्रवारी राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक संमत झाले होते. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी विधेयकाला मंजुरी दिली होती. या नव्या कायद्यामुळे जमिनीशी निगडित वादांचे प्रमाण कमी होईल. वक्फ बोर्डाचे काम कुशल, पारदर्शक आणि उत्तरदायी ठरेल असा सरकारचा दावा आहे.
पश्चिम बंगालमध्ये हिंसा
वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शनांदरम्यान बंगालच्या मुर्शिदाबामध्ये हिंसा भडकली आहे. राज्य सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याची टीका भाजपने केली आहे. वक्फ दुरुस्ती अधिनियमाच्या विरोधात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर येथे हिंसा झाली असून तणावाचे वातावरण आहे.
ममता सरकारकडून मतपेढीचे राजकारण
काही समाजकंटक सार्वजनिक संपत्ती जाळत आहेत. पोलिसांची वाहने पेटवून देण्यात आली आहेत. निदर्शनांच्या नावाखाली अराजकता पसरविली जात आहे. तर ममता बॅनर्जींचे सरकार मतपेढीच्या राजकारणात व्यग्र आहे. राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्यात यावे. राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी केली आहे.
कलम 163 लागू
भाजप नेते अमित मालवीय यांनी मुर्शिदाबाद जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत पोस्ट केली. या आदेशानुसार तेथे बीएनएसएसचे कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशानुसार ही बंदी 48 तासांपर्यंत प्रभावी राहणार आहे. तर जंगीरपूरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.