अमेरिकेच्या संरक्षण सल्लागारपदी वॉल्झ
भारत समर्थक गटाचे होते प्रमुख, चीनचे कट्टर विरोधक, भारतासाठी लाभदायक होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या संरक्षण सल्लागारपदी भारताचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माईक वॉल्झ यांची नियुक्ती केली आहे. वॉल्झ हे चीनविरोधक गणले जातात. वॉल्झ हे निवृत्त सैनिकी उच्चाधिकारी असून भारत समर्थक गटाचे (इंडिया कॉकस) प्रमुख होते. त्यांच्या नियुक्तीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि समारिक संबंध अधिकच दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने भारताशी आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करावी असा वॉल्झ यांचा आग्रह आहे.
वॉल्झ यांच्या नियुक्तीमुळे आगामी ट्रंप प्रशासनाच्या धोरणांची दिशा स्पष्ट होत आहे. ट्रंप प्रशासन भारत-प्रशांत महासागरीय क्षेत्रात आपले बळ अधिक वाढवेल असे संकेत वॉल्झ यांच्या नियुक्तीमुळे मिळत आहेत. ट्रंप आणि वॉल्झ हे दोन्ही नेते चीनचा सर्वात मोठा धोका मानतात. वॉल्झ यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात अनेकदा आवाज उठविला असून इशाराही दिला आहे. तसेच जगात कोरोनाचा उद्रेक होण्यास चीन कारणीभूत असल्याने चीनमध्ये आयोजित केल्या गेलेल्या 2022 च्या शीतकालीन ऑलिंपिक स्पर्धेवर अमेरिकेने बहिष्कार घालावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यांचे चीनविरोधातील अनेक लेख ख्यातीप्राप्त नियतकालिकांमध्ये आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत.
भारतासाठी लाभदायक
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी माईक वॉल्झ यांची झालेली नियुक्ती भारताच्या पथ्यावर पडणारी असून ती भारतासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहात भारत समर्थक गटाचे प्रमुख या नात्याने त्यांनी भारताशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केलेले आहे. आता ते ट्रंप प्रशासनात अतिमहत्वाच्या पदावर नियुक्त झाल्याने अमेरिकेचे धोरण भारताला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रात भारताशी अनेक नवे करार होऊ शकतात. तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त सैनिकी सराव आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका आता आहेत, त्याहीपेक्षा अधिक जवळ येतील, असे मानले जाते.
चीनला विरोध
वॉल्झ यांनी चीनच्या धोरणांना आणि विस्तारवादाला नेहमीच विरोध केला आहे. विशेषत: चीनच्या तैवानविषयक धोरणाला त्यांचा कडाडून विरोध राहिला आहे. अमेरिकेने आता मध्यपूर्वेपेक्षा प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील चीनच्या कारवायांसंबंधी अधिक सजग व्हावे, असा सल्ला त्यांनी नेहमीच दिला आहे. डेमॉव्रेटिक पक्षाच्या सत्ताकाळात अमेरिकेने संरक्षणावरील खर्च कमी केल्याने चीनला हातपाय पसरण्यास मुभा मिळाली. आता अमेरिकेने सैनिकी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ करावी आणि प्रशांत-हिंदी महासागर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करावा, असे मत त्यांनी नेहमी आग्रहपूर्वक मांडले आहे. त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती यामुळे भारतासाठीही अतिशय महत्वाची ठरणार आहे. भारताला आपली संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी ही संधी आहे.
वॉल्झ यांचा अल्पपरिचय
माईक वॉल्झ हे 50 वर्षांचे असून त्यांनी अमेरिकेच्या भूसेनेत महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते ते निवृत्त आर्मी ग्रीन बॅरेट असून अमेरिकेच्या सामरिक कार्यवाहीचा आणि धोरणांच्या व्यापक अनुभव त्यांना आहे. ते फ्लोरिडा प्रांताचे लोकप्रतिनिधी आहेत. अमेरिकेच्या संसदेत त्यांनी नेहमीच चीनविरोधी भूमिका घेतली असून अमेरिकेने भारताशी संबंध अधिक दृढ करावेत अशी मागणी केलेली आहे. ते अमेरिकेच्या संसदेत भारत समर्थक गटाचे प्रमुख राहिलेले आहेत.
वॉल्झ नियुक्तीमुळे धोरण स्पष्ट
ड भारत समर्थक आणि चीनविरोधक वॉल्झ यांच्या नियुक्तीमुळे धोरणस्पष्टता
ड भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागिदारी दृढतेसाठी उपयुक्त
ड प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर भागात अमेरिका बलवान होणार
ड चीनच्या वाढत्या विस्तारवादाला रोखण्याला प्राथमिकता देण्याची मानसिकता