For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळव्यातील जळीत सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा : आमदार जयंत पाटील; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

03:32 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाळव्यातील जळीत सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा   आमदार जयंत पाटील  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Advertisement

ईश्वरपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसाअभावी जळून गेलेल्या सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे निवेदन सादर केले.

Advertisement

यंदा पावसाचे प्रमाण कमी असून मागील 35 ते 40 दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद आणि भाजीपाला या खरीप पिकांवर परिणाम झाला असल्याचे जयंत पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, शासनाने दुष्काळ जाहीर करून तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून संबंधित सवलती लागू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच वाकुर्डे, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी सुरू करून या योजनांच्या लाभक्षेत्रातील तलाव भरावेत. त्यातून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता करून द्यावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Advertisement

सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीवरील जलसाठ्यांचा वापर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वाढविण्याची मागणीही पाटील यांनी केली. पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळी परिस्थितीत शेती आणि पशुधनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने थेट आर्थिक मदत द्यावी, शेतमजूर कुटुंबांसाठीही विशेष मदतीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठ्यातील अडचणी दूर करून लोडशेडिंग कमी करावे, विद्युत रोहित्रांची दुरुस्ती करावी आणि पशुधनासाठी पुरेसे पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाच्या दीर्घ खंडामुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे अलीकडील अहवालांत नमूद झाले आहे. सांगली जिल्ह्यातही पावसाच्या खंडामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती प्रशासनाच्या पातळीवर समोर आली आहे.

Advertisement
Tags :

.