सावंतवाडीत भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी येथील सबनीसवाडा, शाळा क्रमांक ४ जवळील शिवराम उर्फ काका तेंडोलकर यांच्या घराच्या मागील बाजूची भिंत मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने त्यांचे भाऊ हेमंत तेंडोलकर हे या दुर्घटनेत थोडक्यात बचावले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या मागील बाजूची भिंत कमकुवत झाली होती. मध्यरात्री अचानक ही भिंत ये-जा करणाऱ्या रस्त्यावर कोसळली. ही घटना रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला. भिंत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वी हेमंत तेंडोलकर त्या ठिकाणी गेले होते. मात्र, ते सुदैवाने बालंबाल बचावले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन सभापती तथा या भागाच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज राऊळ उपस्थित होते.