For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नशामुक्त, अवयवदान जागरुकतेसाठी उद्या वॉकेथॉन

03:05 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नशामुक्त  अवयवदान जागरुकतेसाठी उद्या वॉकेथॉन
Advertisement

डॉ. रवि पाटील, लक्ष्मण अरनरी यांची पत्रकार परिषद : जिल्हा क्रीडांगण-सरदार्स मैदानापर्यंत आयोजन

Advertisement

बेळगाव : आजकाल व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुण पिढी व्यसनाला ग्रासली असून यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिक कृतीची गरज ओळखून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने नशामुक्त भारत अभियान सुरू केले आहे. त्यानुसार ‘स्वस्थ भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत नशामुक्त भारत व नशामुक्त कर्नाटक करण्याच्या उद्देशाने शनिवार दि. 28 रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा क्रीडांगण ते सरदार्स मैदानापर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आचार्य देशभूषण महाविद्यालयाचे प्रमुख लक्ष्मण अरनरी यांनी दिली.

कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहयोगाने राज्यभरात जिल्हावार जागरुकता मोहीम राबवून वॉकेथॉन आयोजित केली जात आहेत. देशात अमली पदार्थ, दारू व तंबाखूचे व्यसन हे दीर्घकाळापासून एक मूक संकट म्हणून पुढे येत आहे. यामध्ये तरुणाई भरडली जात आहे. यासाठी तरुण पिढीला नशामुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांना व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

डॉ. रवि पाटील म्हणाले, या  वॉकेथॉनचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात येणार असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भगवान बी. सी. हे नशामुक्तीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार आसिफ सेठ असणार आहेत. तसेच जिल्ह्यातील अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. हे वॉकेथॉन जिल्हा क्रीडांगणापासून सुरू होणार असून राणी चन्नम्मा सर्कलमार्गे सरदार्स मैदानापर्यंत होणार आहे,असे त्यांनी सांगितले.

या मोहिमेमध्ये नशामुक्ती व अवयवदान यावर भर देण्यात आला आहे. दरवर्षी रुग्णांना सुमारे 5 लाख अवयवांची आवश्यकता असते. मात्र आपल्या देशात अवयवदान करण्याकडे कानाडोळा करतात. अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळते. यासाठी अवयवदान करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार असून या उद्देशानेच वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. यामध्ये 57 महाविद्यालये, 500 प्राध्यापक व 600 विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिन पट्टणशेट्टी, अडिवेश अरकेरी, विनय मोहन, ए. एस. अरकी, नामदेव माळगे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.