जागर राष्ट्रभावनेचा...उत्साह फायनलचा
वृत्तसंस्था / अहमदाबाद
आयपीएल स्पर्धेतील अंतिम संघर्षाच्या आधी अहमदाबादच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या एका जल्लोषी कार्यक्रमात राष्ट्रभावनेचा जागर करण्यात आला आहे. ‘सबसे आगे होंगे हिंदुस्थानी’ आणि ‘दुष्मन के छक्के चुडा देंगे, हम इंडियावाले’ या लोकप्रिय गाण्यांचा आधार घेत एक देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम क्रीडांगणावर सादर करण्यात आला. यावेळी, पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी नुकत्याच हाती घेण्यात आलेल्या ‘सिंदूर’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर, ‘ऑनरिंग द इंडियन आर्मड् फोर्सेस’, सॅल्यूट टू द इंडियन आर्मड् फोर्सेस’ आणि थँक यू आर्मड् फोर्सेस’ अशी घोषवाक्ये क्रीडांगणावर लावण्यात आलेल्या सर्व डिजिटल फलकांवर झळकत होती. हे डिजिटल फलक सीमारेषेच्या बाहेर जाहीरातींसाठी लावण्यात आले होते.

त्यांच्यावर या अंतिम सामन्याला प्रारंभ होण्याआधी असे ही घोषवाक्ये झळकल्याने क्रीडांगणातील अवघे वातावरणच देशभक्तीने भारुन गेल्याचे दिसून येत होते. यासमवेत, बॉलिवुड प्लेबॅक सिंगर शंकर महादेवन आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ आणि शिवम यांच्या कंठातील जोषपूर्ण गीतांनी क्रीडांगणात खचाखच भरलेल्या क्रीकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. महादेवन आणि त्यांच्या पुत्रांनी ‘लक्ष्या’ या गाजलेल्या देशभक्तीपर चित्रपटातील ‘कंधोंसे मिलते है कंधे’, ए वतन मेरे, आबाद रहे तू’ आणि ‘लक्ष्या’ ही गीते सादर केली. या ओजस्वी गीतांच्या कार्यक्रमाची सांगता ‘सबसे आगे होंगे हिंदुस्थानी’ या गीताने करण्यात आली. आयपीएलची ही 18 वी स्पर्धा ‘सिंदूर’ अभियानामुळे 10 दिवस थांबविण्यात आली होती. नंतर ती पूर्ववत पार पडली आहे. या स्पर्धेचा अंतिम संघर्ष रॉयर चॅलेंजर्स, बेंगळूर आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये झाला. या संघर्षाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद क्रीडांगणात उपस्थित असणाऱ्या सहस्रावधी आणि देशातील कोट्यावधी क्रीकेटप्रेमींनी मन:पूत घेतला. सारा देशच जणू आयपीएलमय झाल्याचा सुखद अनुभव यावेळी आला.