धर्मभावना दुखावल्याने वजाहतला अटक
वृत्तसंस्था/कोलकाता
हरियाणातील शमिष्टा पनोली या इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरच्या विरोधात धर्मभावना दुखाविल्याची तक्रार करणारा वजाहत खान यालाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावरही धर्मभावना दुखावणारी पोस्ट सोशल मिडियावर टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तो सध्या बेपत्ता असून कोलकाता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पनोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन संमत केला असून आता या तक्रारदारालाच कोलकाता पोलीस शोधत आहेत. वजाहत खान हा कोलकाता येथील रशिदी फाऊंडेशन या संस्थेचा सहसंस्थापक आहे. त्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. सोशल मिडियावर अशी पोस्ट टाकून आता त्याने पलायन केले आहे. त्याने सादर केलेल्या तक्रारीवरुनच शर्मिष्टा पनोली हिला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती.
व्यक्त केला आनंद
शर्मिष्टा पनोली हिला अटक करावी अशी मागणी त्याने केली होती. तसेच तिला अटक झाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त करणारी पोस्ट त्याच्या ‘एक्स’ खात्यावर टाकली होती. मात्र, त्याने ज्या गुन्ह्याचा आरोप पनोली हिच्यावर केला होता, त्याच गुन्ह्यासाठी आता त्याला अटक करण्याची वेळ कोलकाता पोलिसांवर आली आहे. त्याने हिंदूंची पवित्र देवता असणाऱ्या कामाख्या देवीसंबंधी अवमानजक आशय प्रसिद्ध केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कामाख्या देवीचे मंदिर आसाममध्ये आहे. ही देवता हिंदू समाजात आराध्य आहे. या देवतेसंबंधी वजाहत खान याने अवमानजनक पोस्ट टाकली होती. अशा प्रकारे ज्याच्या तक्रारीवरुन पनोली हिला अटक करण्यात आली होती, तसाच गुन्हा केल्याने आता त्यालाही अटक करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अशा प्रकारे एका कथित गुन्ह्याच्या तक्रारदाराला त्याच गुन्ह्यासाठी अटक करण्याचा प्रसंग पोलिसांवर उद्भवला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांची मागणी
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी वजाहत खान याला आसाम पोलिसांच्या आधीन करावे अशी मागणी केली आहे. त्याने कामाख्या देवीची निंदा करुन हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात आसाममध्ये तक्रार सादर करण्यात आली आहे. आसाम पोलिसही त्याचा शोध घेत आहेत. निंदाजनक आणि प्रक्षोभक पोस्ट टाकून तो बेपत्ता झाला आहे.