शेतीकामासाठी घेतलेले कर्ज माफ करा
अ. भा. कृषी कामगार संघटनेतर्फे पंतप्रधानांना निवेदन : ज्येष्ठांना दरमहा 10 हजार निवृत्ती वेतन देण्याची मागणी
बेळगाव : बँक, सोसायट्यांमधून व खासगी व्यक्तींकडून शेती कामासाठी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे. साठी ओलांडलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 10 हजार रुपयेप्रमाणे निवृत्ती वेतन स्वरुपात मानधन देण्यात यावे. अकाली पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकासाठी भरपाई द्यावी, अशा मागण्या अखिल भारतीय कृषी कामगार संघटना बेळगाव जिल्हा समितीने केल्या आहेत. सदस्यांनी मंगळवार दि. 19 रोजी मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शेतकरी हा देशाच्या आर्थिक क्षेत्राचा कणा असून त्यांच्यासाठी सरकारने जारी केलेल्या योजनांची अंमलबजावणी चोखपणे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमच संकटांशी सामना करावा लागतो. शेती उत्पन्नाला योग्य भाव मिळत नसल्याने, अनेकदा शेतकरी, कामगारांना हातांना काम मिळत नसल्याने उदरनिर्वाह चालविणे कष्टाचे होत आहे. अनेक कामगार हातांना काम मिळण्यासाठी शहराकडे स्थलांतर करीत आहेत. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केले तरी सरकार दखल घेत नाही.
नैसर्गिक आपत्ती काळात शेतवडीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. पण नुकसानीची भरपाई देण्यास सरकार हतबल ठरते. याचा फटका शेतकऱ्यांना कायमच बसत असतो. शेतकरी कामगारांना वर्षभर काम देऊन त्यांना योग्य वेतन दिल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. त्या दृष्टीने सरकारने विचार करावा. पंपसेटना स्मार्ट मीटर बसविण्याची सरकारचे धोरण चुकीचे असून यामुळे शेतकऱ्यांना माफकच वीज वापरावी लागते. जादा विजेचे बिल शेतकऱ्यांना भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. स्मार्ट मीटर बसविण्याचे सरकारने बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.