अधिकृत पक्षीय उमेदवारीची प्रतीक्षा कायम
अखेर चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काहींच्या विजयाची गणिते ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांवर अवलंबून आहेत. तर काहींना ‘आपला पक्ष स्वबळावर लढला तरच आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळेल, अन्यथा नाही’ असे वाटतेय.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होऊन मोठ्या प्रतीक्षेनंतर जनतेला नवे नगराध्यक्ष व नगरसेवक मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड नगरपरिषदा तर लांजा, देवरुख व गुहागर नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अर्ज दाखल झाले नव्हते.
दुसऱ्या दिवशीसुद्धा महायुती वा महाविकास आघाडीतील कुठल्याच प्रमुख पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नव्हता. कुणी अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरला नव्हता. मंगळवारी कणकवलीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू होती. तर सावंतवाडीत महायुतीतील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार असल्याची खात्री व्यक्त केली. तरीदेखील महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप ठिकठिकाणी स्पष्टता नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.
निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी यासंदर्भातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. नगरपरिषदांच्या निवडणुका महायुतीनेच होणार असे महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात असले तरी त्याबाबत अधिकृत घोषणा होत नाहीय. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेले शिवसेना आणि भाजपकडून पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. या पक्षप्रवेशांमुळेच महायुती होणार की नाही याविषयीचा सस्पेन्स वाढला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडून स्वबळाची भाषा बोलली जात असल्याने इच्छुक उमेदवार तिकीटाच्या अपेक्षेने शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर काहीजण ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. युती झाली आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर, या विचाराने ते शांत आहेत. महायुती नाही झाली तर आपल्या नावाचा विचार होऊ शकतो, त्यावेळी आपण सर्व ताकदीनिशी सज्ज होऊ, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. सत्तेतील भाजप व शिवसेना या दोन पक्षांना इच्छुकांची सर्वाधिक पसंती आहे.
महायुती झाली तर आणि नाही झाली तर असे दोन्ही पर्याय खुले ठेऊन दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यरत आहेत. महायुती झालीच तर अपेक्षित जागा मिळवण्यासाठी आपल्याकडे सक्षम उमेदवार हवेत यासाठी शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र उमेदवारांची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून झालेली नाही. बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी अधिकृत उमेदवारांची प्रतीक्षा लांबवली जात आहे. बंडखोरांना सोबत घेऊन विरोधी पक्षांना रणनिती आखण्यासाठी जास्त वेळ मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, लांजात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे अस्त्र उपसले आहे. त्यांना महायुती नकोय. पक्षाने स्वबळावर लढावे अशी त्यांची इच्छा आहे. पक्षीय उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अन्य ठिकाणच्या कार्यकर्त्यांचीही भावना थोड्या अधिक फरकाने हीच आहे. मात्र लांजाप्रमाणे त्याविषयीची जाहीर वाच्यता अन्य ठिकाणाहून झालेली नाही.
वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या असतात, असे नेहमी पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मात्र पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याबाबत पूर्णत: स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांना त्यांच्या भावना मांडायला सांगितल्या जातात. पण त्यांची भूमिका ही पक्षाची अंतिम भूमिका ठरत नाही. कारण मैत्रीपूर्ण लढतींमुळे विरोधकांना फायदा होईल याची भीती त्यांना वाटत असते. त्यातच कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हे यश कायम रहावे आणि महाविकास आघाडीला कोकणात डोकं वर काढायला मिळू नये, असे महायुतीतील काही नेत्यांना वाटतेय. पक्षाला मारक आणि विरोधकांना पोषक ठरणाऱ्या गोष्टी घडू नयेत याची काळजी ते घेत आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी पिछेहाट झालेल्या महाविकास आघाडीसाठीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतही काही ठिकाणी नगराध्यक्षपद आणि जागा वाटपावरून काही प्रमाणात कुरबुरी सुरू आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्गात ठाकरे सेनेची ताकद काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत जास्त आहे. परंतु सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर प्रसंगी स्वबळावर लढण्याची भाषा महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून केली जातेय. तर काही ठिकाणी महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी समन्वयाची भूमिकाही घेण्यात आली आहे. मविआत किंवा त्यामधील घटक पक्षांमध्ये उत्साह संचारायला हवा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयापेक्षा मोठे टॉनिक नाही हे मानून ते कामाला लागले आहेत. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार आणि एकेकाळचे भाजप नेते बाळ माने यांनी कंबर कसली आहे. येथे त्यांची सून शिवानी माने ह्या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
महत्त्वाचे म्हणजे शिवानी ह्या भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या आहेत. मुलगी विरोधी पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार याच कारणास्तव राजेश सावंत यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे शिवसेना अथवा मविआकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सावंतवाडीत ठाकरे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सीमा मठकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. कणकवलीत मविआकडून माजी नगराध्यक्ष संदेश पारकर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी राजापूर नगराध्यक्षपदासाठी पहिला अर्ज अपक्ष उमेदवारांकडून दाखल झाला होता. तर महाविकासआघाडीने देवरूख नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षासह सात नगरसेवक उमेदवारांची नावे जाहीर केली. चिपळूण आणि सावंतवाडीत महायुतीची बैठक सुरू होती. कणकवलीत शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना एकत्र येणार असल्याबाबत बैठक झाल्याची माहिती आहे.
महेंद्र पराडकर