आठ वर्षांपासून प्रतीक्षा
आपल्यापैकी प्रत्येकाला केव्हाना केव्हा कोणाची तरी प्रतीक्षा करावी लागलेली आहे. प्रतीक्षा करणे याचा अर्थ वाट पाहणे असा आहे. कित्येकांना तर प्रत्येक दिवशी अशी वाट पहावी लागते. बसपासून आवडत्या व्यक्तीपर्यंत अनेकांची वाट पाहण्यात अनेकांचा बराच वेळ जातो. प्रतीक्षा करणे किंवा करावयास लावणे हा प्रामुख्याने माणसाचा गुणधर्म आहे. मात्र, प्राण्यांनाही अनेकदा प्रतीक्षा करावी लागते. एखाद्या श्वापदाला त्याचे भक्ष्य मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. आपण पाळलेले प्राणीही आपल्या घरी परत येण्याची प्रतीक्षा करतात, असा अनुभव अनेकांना आला आहे. तथापि, ही प्रतीक्षा किती काळ चालू शकणार, यासाठी मर्यादा आहे.
या संदर्भात सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशातील एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. या देशातील सांता क्रूझ नामक शहरात एक कर्करोग रुग्णालय आहे. या रुग्णालयाबाहेर गेल्या आठ वर्षांपासून दिवसभर एक कोंबडा फिरताना दिसून येतो. या कोंबड्याचा धनी या रुग्णालयात उपचारांसाठी येत असे. त्याच्यासमवेत हा कोंबडाही येत असे. आठ वर्षांपूर्वी याच रुग्णालयात या कोंबड्याच्या धन्याचे निधन झाले. तेव्हापासून हा कोंबडा याच रुग्णालयाच्या अवती भोवती दिवसभर आपल्या धन्याची प्रतीक्षा करत घुटमळत राहतो. रात्री तो रुग्णालयाजवळच्या एका झाडावर झोपतो. सूर्य उगवला की पुन्हा रुग्णालयाबाहेर घिरट्या घालतो. रुग्णालयातून आपला धनी बाहेर येईल आणि आपल्याला घरी नेईल, अशी त्याची भावना असल्याचे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, त्याच्या धन्याच्या मृत्यूपासून तो येथेच आहे. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या खरेदी-विक्री केंद्रांचे चालक त्याला खायला देतात. ते त्याचा योगक्षेम पाहतात. हा कोंबडा इतरत्र कोठेही जात नाही. तो केवळ दिवसभर रुग्णालयाच्या परिसरातच फिरत राहतो. त्याच्या धन्याचे निधन झालेले असल्याने तो आता त्याला कधीही दिसणार नाही. पण हे त्या कोंबड्याला समजावायचे कसे, हा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. कारण त्याला माणसाची भाषा कळतच नाही. पण त्याची भावना मात्र माणसाच्या भावनांहूनही अधिक तीव्र आहे. या कोंबड्याचे नाव मार्टिन असे आहे. त्याच्या दिवंगत धन्याच्या घरचे लोकही त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे तो आजही रुग्णालयाच्या बाहेर फिरताना दिसतो.
