For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोकरीची वाट, प्राणाशी गाठ!

06:59 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोकरीची वाट  प्राणाशी गाठ
Advertisement

गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये देशभरात विविध ठिकाणी विदेशात नोकरीला लावतो म्हणून काही एजंट रशियासाठी भारतातून मानवी तस्करी करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये विदेशात उच्चशिक्षित तरुणांना मोठ्या पगाराचे नोकरीचे आमिष दाखवले जाते, त्यांच्या कुटुंबीयांकडून त्या बदल्यात लाखो रुपये वसूल केले जातात आणि वेगवेगळ्या मार्गाने चुकीचा व्हिसा देऊन त्यांना रशियापर्यंत पाठवले जाते. तिथे नेमके त्यांना पकडून, रशियन कायद्याप्रमाणे दहा वर्षे शिक्षेची भीती दाखवली जाते आणि शिक्षा नको असेल तर सैन्यात सहाय्यक म्हणून भरती होण्याची सक्ती केली जाते. काही वेळा प्रवासी म्हणून गेलेल्या युवकांनाही असे फसवल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 26 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात रशिया पुरता गुरफटला आहे. प्रदीर्घकाळ युद्ध चालवल्यामुळे कोणत्याही देशात दबाव निर्माण होतच असतो. माणसांची कमतरता भासू लागते. युद्धातील आपल्या स्वाकियाना परत पाठवावे असा दबाव सरकारवर येत असतो. रशिया हा नावापुरता लोकशाहीवादी प्रत्यक्षात हुकुमशाही देश असल्यामुळे तिथली जनता दबावाखाली आहेच. पण युद्धात होणारी मनुष्यबळाची घट लक्षात घेतली तर कुठून ना कुठून मनुष्यबळ वाढवण्याची तयारी करावीच लागते. त्यासाठी आता विदेशातील युवकांना भुलवून आपल्या देशात आणायचे आणि त्यांचा मरण्यासाठी वापर करायचा असा रशियन सैन्यानेच डाव रचला असेल असे म्हणायला या घटनांमुळे वाव निर्माण झाला आहे. रशियाची हेरगिरी संपूर्ण जगाला परिचित आहे. त्यामुळे कुठल्या देशात असा मरायला तयार असणारा कच्चामाल मिळू शकतो हे त्यांना अनुभवाने माहीत आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ अशी असंख्य राष्ट्रे जगातल्या अशा युद्धात अनेकदा कामी आलेली आहेत. जागतिक महायुद्धांमध्ये सुद्धा या भागातून लोक इतर देशांसाठी लढले. ब्रिटिशांच्या सैन्यात त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल आपल्या सैन्यात आजसुद्धा कौतुकाने सांगितले जाते. काळ बदलला तरी दुर्दैवाने इथल्या लोकसंख्येला पुरेसा रोजगार किंवा नोकऱ्या देण्यास आपले देश आणि आपले शेजारीसुद्धा कमी पडलेले आहे. या देशातील बौद्धिकदृष्ट्या सक्षम वर्ग सुद्धा आपल्या भवितव्याचा विचार करण्यासाठी विदेशात जाण्याचाच विचार करत असतो. अलीकडच्या काळात तर गलेलठ्ठ पगाराच्या शोधात खूप मोठ्या लोकसंख्येने आशिया खंडातून स्थलांतर केलेले आहे. या राष्ट्रांनी कितीही प्रगती केली तरी त्याचा फायदा या देशातील सर्वसामान्य गरीब आणि कष्टकऱ्यांना किंवा नव उच्चशिक्षित कुटुंबांना मिळतोच असे नाही. देशातील वाढती संपत्ती आणि त्या कंपन्यांचे मालक जगातील सर्वात श्रीमंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनत असले तरी त्यांचा देश मात्र अद्यापही कंगालच आहे. इथल्या जनतेला विदेशात जाऊन आपले नशीब आजमावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अशांना फसवून रशियन लष्करात सामील करणे सहज शक्य आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने प्रदीर्घकाळ यावर भाष्य केलेले नव्हते. तरीही रशियात अडकलेले असंख्य युवक मात्र सातत्याने समाज माध्यमाच्या रूपाने भारत सरकार आणि स्थानिक नागरिकांना आपल्याला मदत करण्याचे आवाहन करत होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी या बातम्यांना अफवा म्हटले जात होते. मात्र जेव्हा असे फसवल्या गेलेल्या आणि स्वत:चा बचाव करत फिरणाऱ्या एका गटाने भारतीय दूतावासात येऊन आपली करुण कथा सांगितली, तेव्हा कुठे विदेश मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला. आता देशातील कानाकोपऱ्यातून अनेक युवकांच्या पालकांनी रशियात फसलेल्या आपल्या मुलांना वाचवण्याचे आवाहन सुरू केले आहे. ताजे उदाहरण अगदी काही दिवसांपूर्वीचे आहे. हरियाणातील व्यवस्थापन शास्त्रात उच्च पदवी घेतलेले दोन आते भाऊ अशाच प्रकारच्या संकटात सापडले तेव्हा त्यांनी भारत सरकारशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. या युवकांना नोकरी लावतो म्हणून फसवून नेलेल्या टोळीने पैशासाठी कुटुंबाकडे तगादा लावला आणि जवळपास 35 लाख रुपये वसूल केले. या कुटुंबाने आपली जमीन आणि दागिने विकून टोळीचे पैसे भागवले. पण, त्यापूर्वीच त्यांनी या युवकांना रशियन सैन्याच्या ताब्यात दिले होते. तर तिथे त्यांना युद्धाच्या कामावर सोपवण्याची तयारी चालवली होती. त्यांनासुद्धा दहा वर्षे कायद्याची शिक्षा मिळेल अशी भीती दाखवण्यात आली. या दोन लोकांना त्यांच्या कुटुंबियांनी बरीच रक्कम खर्ची घालून सोडवून आणले आहे. मात्र मानवी तस्करीच्या अशा असंख्य घटना घडत आहेत. रशियाच्या सैन्यात सहाय्यक म्हणून भरती व्हा असे पकडले गेलेल्या युवकांना सांगून दबाव टाकून सैन्यात भरती केले जाते आणि नंतर सहायकाच्या ऐवजी शस्त्रांचे शिक्षण देऊन त्यांना युद्धभूमीवर तैनात केले जाते. गेल्या दोन वर्षात हे युद्ध थांबलेले नाही. लष्करी पोशाखातच एका युवकांच्या टीमने भारतीयांशी संपर्क साधला आणि कदाचित हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल असेसुद्धा सुचित केले होते. यापूर्वी विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनामध्ये अशा तस्करीतून रशियन लष्कराच्या ताब्यात सापडलेल्या युवकांना सोडवण्यासाठी विदेश मंत्रालय प्रयत्नशील असून रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा चालू असल्याचे सांगण्यात आले होते. हे अत्यंत भयानक प्रकार आहेत. उघडकीस आले तेवढेच समाजाच्या समोर आहेत. जे युवक फसले आणि आपल्यावरील अन्यायाची वाचाही फोडू शकले नाहीत त्यांचे काय झाले असेल? देशातून नोकरीच्या शोधात विदेशी धाव घेण्याची गरज भारतीय युवकांना आजसुद्धा लागते हे दुर्दैवच आहे. भारत म्हणजे जगाची बाजारपेठ आहे असे आपण अभिमानाने सांगत असू तर या बाजारपेठेत इथल्या युवकाला पुरेसा रोजगारसुद्धा मिळवून देणे आवश्यक आहे. त्याला ज्या पात्रतेचे शिक्षण मिळते त्या पात्रतेच्या नोकऱ्या मिळत नाहीत हा त्या राज्यातील राज्य सरकारांचा आणि देशातील सर्वोच्च सरकारचेसुद्धा मोठे अपयश आहे. शिवाय असे युवक देश सोडून जातात तेव्हा त्यांची नोंद, त्यांना घेऊन जाणाऱ्यांची नोंद, त्यांनी कुठल्या देशात करार केलेत त्याची खातर करणे हे सरकारी यंत्रणेने आपले काम मानले पाहिजे. सरकारी आणि संसदीय समित्यांनी हे गांभिर्याने घेतले पाहिजे. नाहीतर या चक्रातून सुटका अशक्य.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.