For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : वाईत निकृष्ट रस्तेकामाचा नागरिकांकडून पर्दाफाश 

05:18 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वाईत निकृष्ट रस्तेकामाचा नागरिकांकडून पर्दाफाश 
Advertisement
       सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच दर्जाहीन काम सुरू असल्याचा आरोप
Advertisement

वाई: शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा निधी वाया जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाई न्यायालय या महत्त्वाच्या मार्गावर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या वाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच रस्त्याचे निकृष्ट काम करण्यात आले आहे.
कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणातील डांबर काही ठिकाणी उखडून निघाले असून रस्त्यावरील खडी सैल पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
विशेष म्हणजे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळच सुरू असताना देखील संबंधित विभागाकडून कोणतीही प्रभावी देखरेख होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी, अधिकारी पुढाकार घेताना दिसत नसल्याने ठेकेदाराच्या मनमानीला अभय मिळाल्याचा आरोप होत आहे.
शहरातील नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद हद्दीतील एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व जबाबदार घटकांनी अद्याप ठोस भूमिका का घेतली नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Advertisement
Tags :

.