For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ जाहीर! ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

04:29 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
वीज कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ जाहीर  ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
Energy Minister Devendra Fadnavis
Advertisement

वीज कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश; ऊर्जामंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत; फरकासह मिळणार वेतन

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक घेतली. या वेळी वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ फरकासह देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री फडणवीस यांनी जाहीर केला.

Advertisement

जॉब सिक्युरिटी म्हणून केवळ कंत्राटदार बदलला म्हणून एकतर्फी कामावरून कमी करता येणार नाही. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रूपयांपर्यंत आरोग्य विमा लाभ देण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून त्या माध्यमातून अपघात विमा देणे, कोर्ट केस लिस्ट संपर्क पोर्टलला जोडणार, नोकरीत कंत्राटी कामगारांना वयात सवलत देणार, सर्वांना कंपनीच्या लोगोचे आयकार्ड देणार, 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वीज उद्योगाला स्वतंत्र श्रेणी लागू करणार, बेकायदेशीर कृती करणाऱ्या कंत्राटदारावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल आदी विविध निर्णय या बैठकीत घेण्यात आले. ही वेतनवाढ मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. कोर्ट केस व कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय देखील यावेळी झाला.

हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची मागणी केली आहे. त्या बाबतीत सरकार पातळीवर अभ्यास करून कामगारांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेला दिले.

Advertisement

कंत्राटदार कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक व सामाजिक शोषण करतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊन या शोषित, पीडित कामगारांना न्याय दिला पाहिजे, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केली. या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या लढ्यात सहभाग घेतलेल्या व भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवलेल्या सर्व कामगारांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी अभिनंदन केले.

यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश सरचिटणीस गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री राहुल बोडके, महावितरण सचिव अभिजीत माहुलकर, योगेश सायवनकर, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल भालभर, महानिर्मिती उपाध्यक्ष मोहन देशमुख, विनोद बनसोड, विलास गुजरमाळे, विकास अडबाले व अन्य अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.