For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प. बंगालमधील डॉक्टर्स 41 दिवसांनंतर सेवेत

06:16 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
प  बंगालमधील डॉक्टर्स 41 दिवसांनंतर सेवेत
Advertisement

आजपासून अंशत: कामावर परतणार : सीबीआय कार्यालयावर मोर्चा : आश्वासन न पाळल्यास पुन्हा संपाचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील ज्युनियर डॉक्टर्सचे 10 ऑगस्टपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक येथील आरोग्य भवनाबाहेर सुरू असलेले आंदोलन शुक्रवारपासून मागे घेण्यात आले. आंदोलन संपवण्यापूर्वी त्यांनी आरोग्य भवन ते सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. आंदोलक डॉक्टरांनी गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन शनिवार, 21 सप्टेंबरपासून कामावर ऊजू होणार असल्याची माहिती दिली. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर गेल्या 41 दिवसांपासून डॉक्टर संपावर होते. आता शनिवारपासून ते वैद्यकीय सेवेत कार्यरत राहणार आहेत.

Advertisement

आंदोलक डॉक्टर्स सेवेत परतत असले तरी त्यांचा संप अंशत: सुरू राहणार आहे. ते सध्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा पुरवतील. पूरग्रस्त भागात वैद्यकीय शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. तथापि, ते ओपीडी आणि कोल्ड ऑपरेटिंग थिएटरच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. न्यायासाठी आमचा लढा संपलेला नाही, असे ज्युनिअर डॉक्टरांनी सांगितले. पश्चिम बंगाल सरकारला आम्ही एका आठवड्याची वेळ देत आहोत. या कालावधीत सरकारने सर्व आश्वासनांची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा संप सुरू करू, असा इशारा आंदोलक डॉक्टरांनी दिला आहे.

पश्चिम बंगालमधील पूरस्थिती आणि राज्य सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही अंशत: कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागणीवरून कोलकाता पोलीस आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांना हटवण्यात आल्याचे कनिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मात्र, याचा अर्थ आंदोलन संपले असे नाही. राज्याचे आरोग्य सचिव एन. एस. निगम यांना हटवण्याची आणि ऊग्णालयांमधील धमकीची संस्कृती संपवण्याची आमची मागणी अजूनही सुरू आहे. बंगाल सरकारने विनीत गोयल यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 16 सप्टेंबर रोजी डॉक्टरांची बैठक घेतली होती. बैठकीनंतर ममतांनी आम्ही डॉक्टरांच्या 5 पैकी 3 मागण्या मान्य करत असल्याचे सांगत डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. तसेच  आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार नसल्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या मागणीवरून बंगाल सरकारने कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवले होते. त्यांच्या जागी मनोज वर्मा यांनी पदभार स्वीकारला. आरोग्य विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांच्या भेटीबाबत कोलकाता येथे बराच संघर्ष सुरू होता. चार प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ममता आणि डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. या बैठकीत ममतांनी डॉक्टरांच्या 5 पैकी 3 मागण्या मान्य करून त्यांना कामावर ऊजू होण्यास सांगितले होते. 16 सप्टेंबर रोजी डॉक्टर आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आरोग्य विभागातील आणखी 4 अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. याशिवाय आणखी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.