गिधाडाचा चार देशांचा दौरा
मध्यप्रदेशातल्या एका गिधाडाने नुकताच चार देशांचा दौरा केला आहे. हा दौरा करुन ते आपल्या मूळ स्थानी परतही आले आहे. या राज्यातील विदिशा जिल्ह्यातील हलाली नामक धरणाच्या क्षेत्रातून या गिधाडाला 29 मार्च 2025 या दिवशी पाठविण्यात आले होते. त्याला ‘सॅटेलाईट कॉलर’ही लावण्यात आली होती. त्यामुळे ते कोठे आणि केव्हा गेले याची माहिती नोंद करणे शक्य झाले आहे. या युरेशियन ग्रिफिन प्रजातीच्या गिधाडाने आठ महिन्याच्या आपल्या या प्रदीर्घ दौऱ्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान यांसह आणखी दोन देशांमध्ये फेरफटका मारल्याचे दिसून आले आहे. हे गिधाड आता पुन्हा सुखरुप आपल्या मूळ स्थानी पोहचले आहे. गिधाडांची संख्या आता कमी होत आहे. या पक्ष्याच्या काही प्रजाती तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यांचे संवर्धन करण्याचे आणि त्यांना नामशेष होण्यापासून वाचविण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच त्यांच्या प्रवासाच्या क्षमतेचा अभ्यासही केला जात आहे. याच अभ्यासाचा एक भाग म्हणून मध्यप्रदेशच्या वनविभागाने या गिधाडाचा हा दौरा आयोजित केला होता, अशी माहिती देण्यात आली. सध्या ते राजस्थानात आहे.
हे गिधाड वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मध्यप्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील नागोद येथे जखमी अवस्थेत मिळाले होते. जानेवारीच्या अखेरीस ते आढळल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. हे उपचारही तीन भिन्न भिन्न स्थानी करण्यात आले होते. या गिधाड वाचेल असे वनकर्मचाऱ्यांना वाटत नव्हते. तथापि, त्याच्यावर शक्य ते सर्व उपचार करण्यात आले. त्यामुळे ते पूर्ण बरे झाले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर 20 मार्च 2025 या दिवशी त्याला पुन्हा सोडण्यात आले. या गिधाडाची प्रजाती दूरदूरच्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. या प्रजातीची गिधाडेही कमी होत आहेत. त्यामुळे त्याला वाचविणाऱ्यांची प्रशंसा होत आहे.