व्हीटीयूचा 26 वा दीक्षांत सोहळा शनिवारी
राज्यपाल, उपमुख्यमंत्री-उच्चशिक्षण मंत्र्यांची राहणार उपस्थिती : तिघांना मानद डॉक्टरेट
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) चा 26 वा वार्षिक दीक्षांत समारंभ शनिवार दि. 26 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता जांबोटी रोड येथील व्हीटीयूच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी 52 हजार 025 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती व्हीटीयूचे कुलगुरु प्रा. एस. विद्याशंकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावरचंद गेहलोत असणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर व उच्चशिक्षण मंत्री बसवराज रायरे•ाr उपस्थित राहणार आहेत. यावेळी 45 विद्यार्थ्यांना 94 सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये 38 व्हीटीयू सुवर्णपदके आणि 56 पुरस्कृत सुवर्णपदकांचा समावेश असणार आहे.
एकूण 57 हजार 697 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52 हजार 025 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग व बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी या विभागातील 51 हजार 421, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमधील 586, बी प्लान 12, तर बीएस्सी (ऑनर्स) विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
तिघांना मानद डॉक्टरेट
शिक्षण क्षेत्रातील सेवा आणि कामगिरीची दखल घेऊन व्हीटीयूकडून यावर्षी एकूण तिघांना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. सीएमआर ज्ञानधारा ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सविता राममूर्ती, आर. व्ही. एज्युकेशन इन्स्टिट्युशन्स ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. पी. शाम व एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे.
पदवी मिळालेल्या 52 हजार 025 विद्यार्थ्यांमध्ये 27 हजार 437 विद्यार्थी व 24 हजार 583 विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण टक्केवारी पाहता यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. दावणगेरी येथील जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एच. एम. विश्वनाथ याने 12 सुवर्णपदके मिळविली असून तो सर्वाधिक सुवर्णपदके घेणारा विद्यार्थी ठरला आहे. निपाणी येथील व्ही. एस. एम. सोमशेखर आर. कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या साक्षी हडलगे हिने 8 सुवर्णपदके मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.