व्हीटीयूचा परदेशातही वाढणार विस्तार
विविध देशांतील संस्थांकडून संलग्नता देण्याची विनंती : परवानगीसाठी कुलगुरु राज्य सरकारला पत्र पाठविणार
बेळगाव : व्हीटीयू आपला विस्तार वाढविण्यासाठी उपाययोजना करत असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आता देशासह परदेशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नता देण्याचा विचार करत आहे. यामुळे व्हीटीयूचा विस्तार वाढणार असून शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच देशातील विद्यार्थ्यांनाही परदेशात आपले भवितव्य उज्ज्वल करण्याच्या संधी मिळणार आहेत.
देशाबाहेर कार्यरत असलेल्या संस्थांनी व्हीटीयूकडून मान्यता मिळविण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार सरकारकडे परवानगी मिळविण्यासाठी कुलगुरु एस. विद्याशंकर यांनी पत्र पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विद्यापीठाकडून उपलब्ध माहितीनुसार सौदी अरेबिया, दुबई, दक्षिण आाफ्रिका यासारख्या देशांमधील महाविद्यालयांनी व्हीटीयूकडून मान्यता मिळविण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार व्हीटीयूकडून पावले उचलली जात आहेत.
आंतरराष्ट्रीयस्तरावर आपला विस्तार वाढविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असून त्यानुसार सरकारच्या परवानगीनंतर ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. विद्यापीठाला केवळ राज्यातच मान्यता देण्याची परवानगी आहे. मात्र आता विविध देशांतील संस्थांकडून मान्यता देण्याबाबत विनंत्या करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीयस्तरावर व्हीटीयूचा विस्तार करण्यासाठी कुलगुरु विद्याशंकर हे राज्य सरकारला पत्र पाठविणार आहेत. सरकारने परवानगी दिली तर विद्यापीठ आंतरराष्ट्रीयस्तरावर लोकप्रिय होणार आहे.
सध्या व्हीटीयूमध्ये 220 संलग्न महाविद्यालये असून ही सर्व कर्नाटकातील आहेत. 3 लाख विद्यार्थी विविध तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून व्हीटीयू हे देशातील सर्वाधिक संलग्न महाविद्यालये असलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठ अभियांत्रिकी, बी.टेक, एमबीए व एम.टेक अभ्यासक्रमांचे शिक्षण देत आहे. अलिकडच्या वर्षात विद्यापीठाची लोकप्रियता वाढली असून परीक्षा पूर्ण झाल्यानंतर एका तासाच्या आत विद्यार्थ्यांच्या हाती निकाल देण्यात येतो. यामुळे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी व आधुनिक तंत्रज्ञान वापर करत आहे.
उद्योगाच्या गरजेनुसार व कौशल्य आधारित शिक्षणाला महत्त्व देऊन अभ्यासक्रम अद्ययावत केला आहे. शिवाय व्हीटीयू पदवीधर जगभरातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करत आहेत. यामुळे काही परदेशी विद्यालयांना व्हीटीयूची संलग्नता हवी आहे. यासाठी ते मान्यता देण्याची विनंती करत आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार असून सरकारच्या परवानगीनंतरच परदेशातील संस्थांना संलग्नतेची मान्यता देण्याचा विचार व्हीटीयू करणार आहे.