तीन मतदारसंघांत उद्या मतदान
चन्नपट्टण, शिग्गाव, संडूर विधानसभा मतदारसंघात जाहीर प्रचार संपला
प्रतिनिधी/ बेंगळूर
राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या चन्नपट्टण, शिग्गाव आणि संडूर मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी समाप्त झाला. 13 नोव्हेंबर रोजी तीन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे आज एक दिवस उमेदवार पक्षातील कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी प्रचारावर भर देणार आहेत. सोमवारी जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. 13 नोव्हेंबर रोजी तिन्ही मतदारसंघांमध्ये मतदार होईल तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. सोमवारी जाहीर प्रचार संपल्याने मंगळवारी उमेदवारांना घरोघरी भेट देऊन प्रचार करण्याची मुभा आहे. मतदारसंघाशी संबंधीत नसलेल्या व्यक्तींना सोमवारी सायंकाळीच मतदारसंघाबाहेर जाण्याची सूचना देण्यात आली होती.
चन्नपट्टणमध्ये निजद-काँग्रेसमध्ये चुरस
रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टण मतदारसंघात केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी निजदच्या तिकिटावर पोटनिवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे सी. पी. योगेश्वर यांचे आव्हान आहे. योगेश्वर यांना भाजपचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथे काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप-निजद युतीने कंबर कसली आहे.
शिग्गावमध्ये बोम्माईंच्या पुत्राची कसोटी
हावेरी जिल्ह्याच्या शिग्गाव मतदारसंघात भाजपकडून माजी मुख्यमंत्री व खासदार बसवराज बोम्माई यांचे पुत्र भरत बोम्माई रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे माजी आमदार यासीर अहमद पठाण यांचे आव्हान आहे. तर बळ्ळारी जिल्ह्याच्या संडूर मतदारसंघात खासदार ई. तुकाराम यांची पत्नी अन्नपूर्णा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक आखाड्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे बंगारु हनुमंत यांची लढत रंगणार आहे. तिन्ही मतदारसंघांमध्ये प्रमुख तिन्ही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या वतीने जोरदार प्रचार केला आहे.